...अखेर प्रशिक्षणार्थी पोलिसांचे पगार झाले!

प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंद

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-news पोलिस दलात निवड झाल्यानंतर प्रशिक्षण प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा होती. मात्र, मंगळवारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन क्रेडिट झाल्याचा मॅसेज आला. त्यामुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पोलिस दलात लागल्यापासून पहिला पगार खात्यात जमा झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान होते.
 
 
nagpur-news
 
राज्यात गेल्या चार महिन्यांपूर्वी पोलिस दलात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचा जवळपास ९ महिन्यांचा प्रशिक्षण कार्यकाळ सुरु झाला. हे प्रशिक्षण राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या सुरुवातीपासूनच वेतन देण्याची तरतूद आहे. या वेतनातून ते स्वतःचा खर्च भागविण्यासोबतच कुटुंबीयांनाही आर्थिक हातभार लावत असतात. मात्र, गेल्या जवळपास चार महिन्यांपासून प्रशिक्षणार्थ्यांना वेतनच मिळाले नव्हते. त्यामुळे प्रशिक्षणार्थींची आर्थिक गणिते बिघडली होती. प्रशिक्षणार्थी पोलिसांना सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती केली जाते. शहरातील विविध ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका तसेच गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाते. या काळात ते इतर पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असतात. मात्र, त्यांना गेली चार महिने पगारच नव्हता. त्यामुळे वेतन रखडल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये नाराजी होती. चार महिन्यांपासून थकित असलेले वेतन मंगळवारी (ता. ६ ऑक्टोबर) रोजी खात्यात आले. वेतनाची रक्कम जमा होताच प्रत्येक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मावत नव्हता. पोलिसांची सेवार्थ आयडी ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु होती. पीआरएएन क्रमांक आणि कर्मचाऱ्यांची शिट ऑनलाईन करण्याच्या कामासाठी वेतन रखडले होते, अशी बाब समोर आली.
पहिल्या पगाराचा आनंद औरच
पोलिस दलात भरती झाल्यानंतरही मुलगा किंवा मुलगी आईवडिलांकडून खर्चासाठी पैसे मागत होते. प्रशिक्षण केंद्रातील मेसचा खर्च, प्रवास, मोबाईल रिचार्ज तसेच इतर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पालकच पैसे देत होते. मात्र, मंगळवारी पहिला पगार जमा होताच प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी लगेच कुटुंबीयांसोबत आनंद व्यक्त केला. ‘पहिल्या पगाराची बातच काही और असते’, अशी प्रतिक्रिया एका प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्याने दिली.
 
 
कुटुंबाला आर्थिक हातभार
पोलिस दलात मुलगा लागल्यानंतर आता आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागेल, अशी पालकांची अपेक्षा होती. मात्र, चार महिन्यांपासून वेतनच रखडल्यामुळे पालकांचा हिरमोड झाला होता. मात्र, पोलिस प्रशासनाने वेतन रखडण्याबाबत आलेल्या अडचण सोडवल्यामुळे आता नियमित वेतन होणार आहे. त्यामुळे येत्या महिन्यापासून प्रशिक्षणार्थी कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावण्यासाठी सज्ज आहेत.