टीकाकारांनी घडवला मोदींचा ‘आत्मपरीक्षणाचा’ प्रवास!

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
narendra-modi सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतील अनुभवांना उजाळा दिला. ‘सेवा ज्योती’ कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या आठवणी सांगितल्या. त्या वेळी आपण आजच्या टप्प्यावर पोहोचू, अशी कल्पनाही केली नव्हती, असे मोदी म्हणाले.
 
narendra-modi
 
या २५ वर्षांच्या प्रवासात विविध व्यक्ती आणि घटनांकडून आपल्याला शिकायला मिळाले, असे पंतप्रधानांनी सांगितले. विजय मिळवून देणाऱ्यांनी नम्रता शिकवली, तर पराभव आणि अडचणींनी पुन्हा उभे राहण्याची ताकद दिली. हितचिंतकांनी प्रोत्साहन दिले, तर टीकाकारांनी आत्मपरीक्षण करण्याची शिकवण दिली. समर्थकांकडून श्रद्धेचे महत्त्व समजले, तर विरोधकांनी लोकशाहीची ताकद दाखवून दिली. प्रत्येक संकटाने संयमाची परीक्षा घेतली, प्रत्येक यशाने जबाबदारी वाढवली आणि प्रत्येक कामगिरीने मोठ्या ध्येयांकडे जाण्याचे धैर्य दिले, असे त्यांनी नमूद केले.
 
भारताला २०४७ पर्यंत विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करताना मोदी यांनी ‘सर्वांच्या प्रयत्नां’चा उल्लेख केला. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून ‘आम्ही ते करून दाखवू’ ही भावना पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. जनतेने सातत्याने आपल्यावर विश्वास व्यक्त केला असून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.
 
भारतीय लोकशाही आणि संविधानाला वंदन करत मोदी यांनी देशातील नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आपल्या शक्तीचा आधार असल्याचे सांगितले. ‘सेवा ज्योती’ कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सांगितले की, आज ते ज्या स्थानावर आहेत आणि त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामध्ये जनतेचे योगदान सर्वांत मोठे आहे. देशाने आपल्याला खूप काही दिले असल्याने देशाप्रती आपली जबाबदारीही मोठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २५ वर्षांचा जनतेचा विश्वास आणि या काळातील अनुभव ही मोठी संपत्ती असून ती केवळ आपली नसून संपूर्ण राष्ट्राची असल्याचे मोदी म्हणाले.
 
यावेळी पंतप्रधानांनी वडनगरमधील शालेय जीवनाच्या आठवणीही सांगितल्या. शाळेत असताना विविध विषय शिकण्याची असलेली उत्सुकता आजही कायम असून आपण स्वतःला अजूनही विद्यार्थीच मानतो, असे त्यांनी सांगितले. दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मोदी म्हणाले. आपल्या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहताना आपल्याला केवळ कृतज्ञतेची भावना जाणवते, असे सांगत त्यांनी आपल्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेचा प्रवास जनतेच्या विश्वासाशी जोडला.