पाकिस्तानी हेरांशी संपर्काच्या संशयावरून दोघांना अटक

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
विजयवाडा
operation firewall 2026 पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी कथित संपर्क आणि हेरगिरीच्या संशयावरून आंध्र प्रदेश काउंटर इंटेलिजन्स सेलने मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन फायरवॉल-२०२६’अंतर्गत १३ नौदल कर्मचाऱ्यांसह १८ संशयितांच्या कथित हेरगिरी मॉड्यूलची चौकशी करण्यात आली. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक नौदलाशी संबंधित कर्मचारी आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनाही १४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 

operation firewall 2026 ap ci cell arrests two in alleged pakistan spy network case 
काउंटर इंटेलिजन्स सेलच्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशसह दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी हे अभियान राबविण्यात आले. विशाखापट्टणम तसेच इतर महत्त्वाच्या सामरिक ठिकाणांशी आणि संरक्षण आस्थापनांशी संबंधित संवेदनशील व गोपनीय माहिती एन्क्रिप्टेड माध्यमातून कथित पाकिस्तानी गुप्तचर एजंटांपर्यंत पोहोचविल्याचा संशय या १८ जणांवर आहे. या प्रकरणी २ सप्टेंबर २०२६ रोजी विजयवाडा येथील काउंटर इंटेलिजन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासासाठी आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड आणि बिहार या दहा राज्यांमध्ये काउंटर इंटेलिजन्स सेलची १२ पथके तैनात करण्यात आली होती. राज्य दहशतवादविरोधी पथक, नौदल अधिकारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांच्या भूमिकेची तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान संशयितांची इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात दोन संशयितांची या प्रकरणातील भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून, उर्वरित संशयितांबाबत तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अन्नम साई वरप्रसाद याचा समावेश आहे. तो विशाखापट्टणम येथे नौदल अधिकाऱ्यांसाठी नागरी कंत्राटी चालक म्हणून काम करत होता. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित व्यक्तीला नौदल आणि संरक्षण आस्थापनांशी निगडित संवेदनशील माहिती पुरवल्याचा तसेच त्याबदल्यात पैसे घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याला विशाखापट्टणम येथून अटक करण्यात आली.
दुसरा आरोपी प्रदीप मुखर्जी याला तमिळनाडूतील कोयंबतूर येथून ताब्यात घेण्यात आले. तो विशाखापट्टणम नौदल तळावर कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तपास यंत्रणेच्या आरोपानुसार, त्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित व्यक्तीला व्हॉट्सॲप खाते सक्रिय करण्यासाठी ओटीपी उपलब्ध करून दिला. तसेच संबंधित व्यक्तीच्या संपर्कात राहून नौदल आणि संरक्षण आस्थापनांशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
दरम्यान, पाकिस्तानसाठी कथित हेरगिरी केल्याच्या आरोपावरून आसाम पोलिसांनी नुकतेच दोन जणांना अटक केली होती. केंद्रीय यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये निवृत्त लष्करी जवानाचाही समावेश असून, तो कंत्राटी पद्धतीने लष्कराशी संबंधित काम करत असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी सांगितले होते.