हुडकेश्वरमध्ये सामाजिक सलोखा राखण्याचा निर्धार

शांतता अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
hudkeshwar परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याच्या उद्देशाने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. परिसरातील सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये परस्पर समन्वय आणि सहकार्य वाढावे, या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान शांतता समितीच्या सदस्यांनी आपल्या भागातील विविध विषयांवर मते व सूचना मांडल्या.
 
hudkeshwar
 
यावेळी नागरिकांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय राखून परिसरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीला डॉ. दीपक शेंडेकर, डॉ. मिलिंद वाचनेकर, जयंत बडवाईक, विश्वास वाकेकर, डॉ मनीषा ठाकरे, वर्षा गुजर, रंजना बोरकर, रोशनी किटे, जगदीश पाटमासे आदी शांतता समितीचे सदस्य व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत उपस्थित सदस्यांनी प्रशासनासोबत समन्वयाने काम करून परिसरातील शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केला.
 
1. आगामी सर्व सण उत्सव शांततेत, सलोख्याने व परस्परांच्या धार्मिक भावना न दुखावता साजरे करावेत.
 
 
2. मिरवणूक, धार्मिक कार्यक्रम व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पोलीस प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व परवानगीतील अटींचे पालन करावे.
 
 
3. कोणत्याही प्रकारच्या अफवा, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संदेशांवर विश्वास ठेवू नये व ते पुढे प्रसारित करू नयेत.
 
 
4. सोशल मीडिया ग्रुपमध्ये जातीय, धार्मिक किंवा तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ अथवा संदेश प्रसारित करू नयेत.
 
 
5. सण उत्सवाच्या ठिकाणी महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या सुरक्षिततेस विशेष प्राधान्य देण्यात यावे.
 
 
6. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे योग्य नियोजन करून वाहतूक कोंडी होणार नाही तसेच आपत्कालीन वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
 
 
7. ध्वनिक्षेपकाचा वापर करताना ध्वनी प्रदूषणासंदर्भातील शासनाच्या नियमांचे पालन करावे व निर्धारित वेळेचे उल्लंघन करू नये.
 
 
8. कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
 
 
9. शांतता समिती व महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांमध्ये शांतता, बंधुभाव व सामाजिक सलोखा राखण्यासाठी जनजागृती करावी.
 
 
10. कोणत्याही किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या वादात होऊ नये यासाठी कायदा हातात न घेता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. सदर बैठक शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असून उपस्थित सदस्यांनी पोलीस प्रशासनास आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.