कारंजा लाड,
shri-guru-mandir-sansthan राज्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा कठीण परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री गुरु मंदिर संस्थानने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल ११ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.या मदतीचा धनादेश वाशीमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडे संस्थानच्या विश्वस्त मंडळींच्या वतीने सुपूर्द करण्यात आला.

दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा मिळावा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार मिळावा, या सामाजिक भावनेतून संस्थानने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.यंदा पावसाचे कमी प्रमाण, पावसातील मोठे खंड आणि त्याचा शेती उत्पादनावर झालेला विपरीत परिणाम यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. अनेक भागांमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकर्यांसह शेतमजुरांनाही रोजगाराच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना शासनाच्या मदतीसोबतच सामाजिक संस्था, धार्मिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर श्री गुरु मंदिर संस्थानने केलेली ११ लाख रुपयांची मदत समाजाप्रती असलेल्या संस्थानच्या बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे. संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक सेवा असून, या उपक्रमातून इतर सामाजिक व धार्मिक संस्थांनाही दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
धनादेश सुपूर्द करताना संस्थान चे व्यवस्थापक प्रकाश घुडे, कोषाध्यक्ष अभय पारस्कर अविनाश खेडकर व मंडळींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आल्याने दुष्काळग्रस्तांसाठीच्या मदतकार्यात या निधीचा उपयोग होण्यास हातभार लागणार आहे.दुष्काळाच्या संकटात माणुसकीचा हात पुढे करणार्या श्री गुरु मंदिर संस्थानच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.