फ्रान्समध्ये २,००० शाळा बंद, लाखो विद्यार्थी रस्त्यावर!

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
पॅरिस,
students take to streets in France फ्रान्समध्ये शाळांमधील सुविधांचा अभाव, शिक्षकांची कमतरता आणि विद्यार्थ्यांवरील वाढता शैक्षणिक दबाव याविरोधात सुरू झालेले आंदोलन आता देशव्यापी बनले आहे. सप्टेंबरच्या अखेरीपासून शेकडो हायस्कूलच्या प्रवेशद्वारांवर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत शाळा बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच फ्रान्स सरकारसमोर कायदा-सुव्यवस्थेचेही आव्हान निर्माण झाले आहे.देशभरातील वाढत्या आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी या आठवड्यात फ्रान्समधील हायस्कूलचे वर्ग स्थगित केले आहेत. दरम्यान, शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यासाठी तसेच शिक्षकांची भरती करण्यासाठी एका कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अनुपस्थित असलेल्या शिक्षकांच्या जागी पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देण्यापासून शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यापर्यंतच्या मुद्द्यांवर सरकारकडून विचार सुरू आहे.
 
 
 
francestudents take to streets in France
 
मंगळवारी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक रस्त्यावर उतरले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आंदोलनातील सहभागींची संख्या सुमारे अडीच लाख होती. मात्र आंदोलनाच्या आयोजकांनी ही संख्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांसह सुमारे पाच लाख असल्याचा दावा केला आहे. हायस्कूल विद्यार्थी संघटनेच्या म्हणण्यानुसार, जवळपास २,००० हायस्कूल दिवसभर बंद ठेवण्यात आली किंवा आंदोलनामुळे त्यांचे कामकाज प्रभावित झाले.‘त्यांना आमची पर्वा नाही’ आणि ‘जगा किंवा शिका’ अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले. स्ट्रासबर्ग, ल्योन आणि रेन येथे परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली. पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी अश्रुधूराचा वापर केला, तर काही आंदोलकांनी रस्त्यांवर आग लावून वस्तू फेकल्याच्या घटना घडल्या.
 
 
विद्यार्थ्यांच्या प्रमुख तक्रारींपैकी एक म्हणजे शिक्षकांची अनुपलब्धता. एखादा शिक्षक गैरहजर राहिल्यानंतर त्याच्या जागी पर्यायी शिक्षकाची व्यवस्था अनेकदा होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परिणामी काही वर्ग रद्द होतात किंवा विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण खंडित होते. ही समस्या दूर करण्यासाठी अनुपस्थित शिक्षकांच्या जागी मनुष्यबळ कसे उपलब्ध करता येईल, याचा आढावा घेण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. वर्गांमध्ये वाढलेली विद्यार्थ्यांची संख्या हाही आंदोलनातील महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, वर्गांमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे अध्यापनावर परिणाम होतो. प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतंत्रपणे लक्ष देण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
 
शाळांच्या भौतिक सुविधांबाबतही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक जुन्या आणि खराब अवस्थेतील शाळांच्या इमारतींकडे सरकारचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये पाणी गळतीपासून उंदरांचा प्रादुर्भाव होण्यापर्यंतच्या समस्या असल्याचे सांगितले. मूलभूत सुविधांची देखभाल होत नसेल, तर अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यायचे, असा सवाल आंदोलकांकडून केला जात आहे.शाळेच्या दिवसाची वेळ हा देखील आंदोलनातील चर्चेचा विषय बनला आहे. पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी मंत्र्यांना सकाळी अंदाजे ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असलेल्या शाळेच्या वेळापत्रकाचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणासाठी अधिक वेळ देण्याची गरज आहे का, याचाही विचार करण्यास सांगण्यात आले आहे.
 
शाळांसाठी उपलब्ध असलेल्या निध्याचा मुद्दाही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. आंदोलकांच्या मते, अनेक वर्षांपासून झालेल्या अपुऱ्या गुंतवणुकीचा परिणाम शाळांमधील कर्मचारी, देखभाल व्यवस्था आणि पायाभूत सुविधांवर झाला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, फ्रान्समधील शिक्षणावरील खर्च महागाईच्या दरापेक्षा कमी राहिला आहे.या आंदोलनामागे सामाजिक असमानतेचाही मुद्दा असल्याचे समोर आले आहे. फ्रान्समधील प्रत्येक विद्यार्थ्याला समान दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याची तक्रार आहे. विशेषतः वंचित भागांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या समस्यांचा अधिक सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबरमध्ये पॅरिसच्या आसपासच्या वंचित भागांतून सुरू झालेल्या आंदोलनाचा विस्तार पुढे देशभर झाला. विद्यार्थ्यांच्या मते, त्यांना मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा अनेकदा ते कोणत्या भागात राहतात यावर अवलंबून असतो.मात्र विद्यार्थ्यांचा असंतोष केवळ शिक्षक, इमारती आणि शाळेच्या वेळांपुरता मर्यादित नाही. शैक्षणिक ताण, सहाय्यक कर्मचाऱ्यांची कमतरता, फ्रेंच शिक्षण व्यवस्थेतील अडचणी आणि विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेतील समस्याही आंदोलनात मांडल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या मते हे सर्व प्रश्न एकमेकांशी जोडलेले आहेत. शिक्षकांची कमतरता, गर्दीचे वर्ग, जीर्ण शाळा आणि दीर्घ शालेय दिवस यामुळे विद्यार्थ्यांचा आधीच आव्हानात्मक असलेला