धान उत्पादकांना बोनस जाहिर करून दिवाळीपूर्वी देयके द्या; आ. रहांगडाले

आधारभूत खरेदी केंद्र व धान उत्पादकांच्या समस्यांवर मंत्रालयात मंथन

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
तिरोडा,
tiroda-paddy-procurement-bonusतिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध समस्या तातडीने सोडवाव्यात व धान उत्पादक शेतकर्‍यांना बोनस जाहिर करावा त्याचबरोबर त्यांच्या धानाचे पैसे दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी आ. विजय रहांगडाले यांनी बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात आयोजित मागणी बैठकीत केली.
 

dhan 
धान खरेदी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत आ. रहांगडाले यांनी खा. प्रफुल्ल पटेल, व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी सविस्तर चर्चा करून शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये आणि धान खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रसंगी त्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांना नोंदणी, टोकन, धानाची मोजणी, बारदाना उपलब्धता, वजनकाटा, वाहतूक तसेच धानाची उचल आणि साठवणूक यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्याची विनंती केली. धान उत्पादक शेतकरी वर्षभर मेहनत करून आपल्या शेतात धानाचे उत्पादन घेतात.
 
उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना धान विक्रीनंतर मिळणारे पैसे त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे धान खरेदी झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यावर देय रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी. विशेषतः दिवाळी सणापूर्वी धान उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या धानाचे पैसे मिळावेत, तसेच धान उत्पादक शेतकर्‍यांना बोनस जाहीर करण्यात यावे अशी आग्रही मागणी बैठकीत करण्यात आली.
 
याकडेही वेधले लक्ष ....
आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांची गर्दी होऊ नये, त्यांना रात्रंदिवस प्रतीक्षा करावी लागू नये आणि धान विक्रीसाठी अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी केंद्रांची क्षमता व आवश्यक मनुष्यबळ वाढविण्यात यावे, धान खरेदी प्रक्रियेत शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकारी व खरेदी केंद्र चालकांनी नियमितपणे आढावा घ्यावा. शेतकर्‍यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, तसेच धानाची वेळेत उचल करून खरेदी केंद्रांवर जागेअभावी निर्माण होणार्‍या अडचणी दूर कराव्यात याबाबींकडेही लक्ष वेधण्यात आले.