जिल्ह्यात तंबाखू विक्रेत्यांवर ‘कोटपा’चा दंडूका!

तीन वर्षांत १,३४९ जणांवर कारवाई

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
tobacco banतंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात कोटपा कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या दुकानदारांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. विशेषतः शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात तीन वर्षात १ हजार ३४९ जणांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
 

tabaco 
गुटखा, खर्रा, तंबाखू, मावा, पानमसाला आदी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर विविध निर्बंध असतानाही अनेक नागरिकांकडून त्यांचे सेवन सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी जनजागृतीसोबतच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत तंबाखूविरोधी मोहिमेंतर्गत कारवाईत सातत्याने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यात २०२३-२४ मध्ये १७९ जणांवर कारवाई करून २४ हजार ३८० रुपये दंड वसूल करण्यात आला. २०२४-२५ मध्ये ४२० जणांवर कारवाई करून ७४ हजार २० रुपये दंड वसूल झाला.
 
२०२५-२६ मध्ये कारवाईचा आकडा ६०४ वर पोहोचला असून, १ लाख ३ हजार ३७० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर २०२६-२७ मध्ये सप्टेंबरअखेर १४६ जणांवर कारवाई करून २६ हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील तंबाखू विक्रीला आळा घालण्यासोबतच नागरिकांनीही तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
पाच रुग्णालयांत समुपदेशन कक्ष
तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन व समुपदेशन मिळावे, यासाठी जिल्ह्यातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया, उपजिल्हा रुग्णालय तिरोडासह सडक अर्जुनी, देवरी व अर्जनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तंबाखूमुक्ती समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या माध्यमातून तंबाखू सेवन करणार्‍यांना व्यसनमुक्तीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे.
जनजागृतीसह तंबाखू सोडणार्‍यांचा सन्मान ...
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थेमध्ये मौखिक स्वच्छता, मौखिक आरोग्य व तंबाखू मुक्त मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर तंबाखूचे व्यसन सोडणार्‍या व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येत आहे.