वृंदावन,
kohlis-visit-to-the-ashram भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि प्रेमानंद महाराज यांच्या भेटीबाबत सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ५ कोटी रुपयांच्या दाव्याला कोहलीच्या प्रवक्त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी विराट कोहलीला कथितरीत्या ५ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा फलाहरी महाराज म्हणून ओळखले जाणारे दिनेश शर्मा यांनी केला होता. मात्र, कोहलीच्या प्रवक्त्याने हा दावा खोटा, निराधार आणि वस्तुस्थितीच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे.
विराट कोहलीच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनानुसार, कोहली प्रेमानंद महाराजांना कोणत्याही आर्थिक कारणासाठी नव्हे, तर त्यांच्यावरील श्रद्धा आणि आदरापोटी भेटतो. त्यामुळे दिनेश शर्मा यांनी केलेले आरोप पूर्णपणे फेटाळण्यात आले आहेत. तसेच अशा प्रकारची माहिती प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तिची योग्य पडताळणी करून जबाबदारीने वृत्तांकन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दाव्यानुसार, जानेवारी २०२३ मध्ये विराट कोहलीची प्रेमानंद महाराजांसोबत पहिली भेट झाली होती. राजस्थानमधील एका खासगी कंपनीसह काही बांधकाम व्यावसायिकांच्या समूहाने ही भेट घडवून आणण्यासाठी कथितरीत्या ५ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात आला होता. प्रेमानंद महाराजांची प्रसिद्धी वाढवण्याच्या उद्देशाने हा खर्च करण्यात आल्याचेही या दाव्यात म्हटले गेले होते.
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी वृंदावनला जात असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. त्यांच्या भेटींचे छायाचित्रे आणि चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. मात्र, या भेटींसाठी ५ कोटी रुपये घेतल्याचा दावा विराट कोहलीच्या प्रवक्त्याने ठामपणे फेटाळला आहे.