घरकुलासाठी उंबरठे झिजवले, अखेर नपत आत्मदहनाचा प्रयत्न!

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
देवळी (वर्धा), 
municipal-office घरकुलाच्या मागणीसाठी तहसीलदारांपासून जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने संतप्त नागरिकाने नगर परिषद कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना ६ रोजी घडली. शंकर केवदे असे या नागरिकाचे नाव असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
 
 
municipal-office
 
केवदे यांच्या म्हणण्यानुसार, ते स्थानिक इंदिरानगर परिसरातील सर्वे क्र. ९६१ मधील जागेवर राहत आहेत. त्यांनी २०१७ मध्ये घरकुलासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, याच सर्वे क्रमांकातील तब्बल १६८ नागरिकांना २०२० मध्ये घरकुलाचा लाभ देण्यात आला असून त्यांना जागेचे पट्टेही देण्यात आले आहेत. मग आपल्यालाच घरकुलाच्या लाभापासून का वंचित ठेवण्यात आले, असा सवाल केवदे यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्या म्हणजे सदर जमिनीच्या नोंदीतील बदल केवदे यांच्या माहितीनुसार यापूर्वी संबंधित ७/१२ उतार्यावर कुरण सरकार अशी नोंद होती. मात्र, २०२३ मध्ये फेरफार नोंद ३ जुलै २०२३ फेरफार क्रमांक ११७६२ करून हीच जमीन झुडपी जंगल म्हणून नोंदविण्यात आली. त्यामुळे कुरण सरकार असलेली जमीन अचानक झुडपी जंगल कशी झाली? फेरफार नेमका कोणत्या आधारावर करण्यात आला? असा गंभीर प्रश्न केवदे यांच्यासह नागरिकांनी उपस्थित केला.
 
 
घरकुलाच्या प्रश्नावर न्याय मिळावा यासाठी केवदे यांनी यापूर्वी पाठपुरावा केला. मात्र, वारंवार कार्यालयांत चकरा मारूनही समाधानकारक माहिती अथवा निर्णय मिळाला नसल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रशासनाच्या नोंदीनुसार संबंधित जागा झुडपी जंगल असल्याने व झुडपी जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने घरकुलाचा लाभ देता येत नसल्याची भूमिका नगरपालिका प्रशासनाने मांडली आहे. मात्र, त्याच सर्वे क्रमांकातील १६८ नागरिकांना घरकुलाचा लाभ आणि पट्टे देण्यात आले असतील तर केवदे यांचाच अर्ज का नामंजूर करण्यात आला? तसेच २०२३ मधील फेरफारानंतर जमिनीचा दर्जा बदलण्यामागील नेमके कारण काय, या प्रश्नांची स्पष्टता प्रशासनाने करावी, अशी मागणी केवदे यांनी केली आहे.