प्रणव सातोकर
नागपूर
agyarām devi temple नागपूरचे अतिप्राचीन, भोसलेकालीन आणि नगरदेवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेशपेठ येथील श्री आग्याराम देवी मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला असल्याची माहिती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी दिली. या निधीतून मंदिर परिसरात भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
यंदा नवरात्रोत्सवात मंदिरात तब्बल ३ हजार १ अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे नागपूरसह देशभरातील तसेच परदेशात स्थायिक असलेल्या भाविकांनीही देवीच्या अखंड ज्योतीसाठी नोंदणी केली आहे. *परदेशातील ४० भाविकांनी मंदिराशी संपर्क साधून ज्योतींसाठी निधी पाठविल्याची माहिती ट्रस्टने दिली*. या ज्योतींचे प्रज्वलन ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते ५ या वेळेत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज सकाळी १० आणि रात्री ८ वाजता देवीची महाआरती होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते ५ या वेळेत घटविसर्जनाचा धार्मिक विधी होईल. उत्सवाची सांगता झाल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पौरोहित्य आयाम, नागपूर महानगर आणि आग्याराम देवी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्र’ अर्थात ‘अयी गिरी नंदिनी’ पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत मंदिर परिसरात होणार आहे.नवरात्रोत्सवासाठी विदर्भ तसेच लगतच्या राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून, दर्शन व्यवस्था, सुरक्षा, प्रसाद आणि अन्य सुविधांसाठी ट्रस्टने स्वतंत्र समित्या गठीत केल्या आहेत. नागपूरकरांसह पंचक्रोशीतील भाविकांनी नवरात्रोत्सवात सहभागी होऊन देवीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष गिरिजाशंकर अग्रवाल, उपाध्यक्ष आ. गिरीश व्यास, सचिव महेशकुमार गोयल, कोषाध्यक्ष सुरेश तिवारी यांच्यासह विश्वस्त व आयोजन समितीने केले आहे.