भिडे हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना बूट व पुरस्कार वाटप

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
नागपूर,
Award distribution at Bhide High School नागपूरमधील सीताबर्डी स्थित ऐतिहासिक भिडे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात ‘लायन्स क्लब नागपूर प्राईड’च्या माध्यमातून ‘ऑक्टोबर सर्व्हिस वीक’ निमित्त अत्यंत उत्साही वातावरणात समाजोपयोगी व शैक्षणिक कार्यक्रमांची मालिका राबवण्यात आली. भारतीय संस्कृतीतील आदरातिथ्य जपणाऱ्या "अतिथी देवो भव" या परंपरेनुसार या विशेष कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याने करण्यात आली, ज्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना गढीकर यांनी ‘लायन्स क्लब नागपूर प्राईड’चे अध्यक्ष लायन मुकुल बर्हानपुरे आणि ऑक्टोबर सर्व्हिस वीकच्या अध्यक्षा लायन प्रणोती मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन आदरयुक्त स्वागत केले.
 
 
xcetry5
 
याशिवाय, मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना गढीकर यांनी क्लबच्या सचिव लायन अपर्णा चिचमलकर यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती नीता कुकडे यांनी कोषाध्यक्ष लायन शुभांगी मानापुरे आणि जीएसटी चेअरपर्सन लायन सुधाकर सातपुते यांचा पुष्प देऊन यथोचित सत्कार केला. या सेवा सप्ताहाचा भाग म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि परिसराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम उत्साहात पार पडले, ज्यामध्ये प्रामुख्याने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते नवीन बुटांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. तसेच, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'पोस्टर मेकिंग' स्पर्धेतील यशस्वी विजेत्या बालकलाकारांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
 
 
पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाळेच्या प्रांगणात सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कारमूर्तींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. आपल्या धकाधकीच्या वेळेतून वेळ काढून शाळेला भेट दिल्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करत अत्यंत स्तुत्य समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना गढीकर यांनी ‘लायन्स क्लब नागपूर प्राईड’च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या संपूर्ण सेवा सप्ताहाच्या आणि विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाच्या वेळी भिडे हायस्कूलचे शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.