रेतीवाहतुकीच्या जड वाहनांना ‘पीक अवर्स’मध्ये बंदी

अपघात, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकार्‍यांचा आदेश

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
ban-on-heavy-sand-transporting-vehicles डांगोर्ली, किन्ही व तेढवा येथील रेतीघाटांवरून गोंदिया शहराकडे ये-जा करणार्‍या जड-अवजड वाहनांमुळे अपघात व वाहतूक कोंडीचा धोका निर्माण होत असल्याने जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी या वाहनांच्या वाहतुकीवर वेळेचे निर्बंध लागू केले आहेत. सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत रेतीवाहतूक करणार्‍या टिप्परना रस्त्यावर उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
 
 
washim-district
 
मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ११५ अन्वये जारी आदेशानुसार ६ चाकी, १० चाकी व १२ चाकी टिप्पर तसेच अन्य जड-अवजड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत संबंधित मार्गावर वाहतूक करता येणार नाही. हा आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून अत्यावश्यक सेवांची वाहने निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. डांगोर्ली, किन्ही व तेढवा येथून दासगाव-निलज-पांढराबोडी मार्गे गोंदियाकडे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जाते. या मार्गावर जड वाहनांची वर्दळ वाढल्याने शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोणतीही दुर्घटना घडू नये, गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
 
गर्दीच्या वेळेत जड वाहनांना ‘ब्रेक’
सकाळी शाळा व कामावर जाण्याची वेळ तसेच सायंकाळची परतीची वेळ लक्षात घेऊन जड वाहनांच्या वाहतुकीला वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे या वेळेत संबंधित मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार असून संभाव्य अपघातांना आळा घालता यावा यासाठी प्रशासनाकडून हे प्रयत्न करण्यात येत आहेत.