ब्रह्मपुरी,
brahmapuri-wildlife-huntingब्रह्मपुरी वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची कथित अवैध शिकार रोखण्यासाठी युवक काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच अवैध शिकारीच्या प्रकारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
युवक काँग्रेसचे ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्ष प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील तसेच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले. ब्रह्मपुरी परिसरातील विस्तीर्ण जंगलामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर यांसह विविध प्रजातींचे वन्यजीव व पक्षी आढळतात. या वनक्षेत्रातून वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात हालचाल होत असल्याने परिसराचे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, परिसरातील काही नागरिकांकडून वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारीबाबत माहिती व चर्चा समोर येत आहेत. त्यामुळे या बाबींची वनविभागाने गांभीर्याने दखल घेऊन जंगल परिसरात गस्त वाढवावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे आणि अवैध शिकारीमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृउबास सभापती प्रभाकर सेलोकर, डॉ. एन. एस. कोकोडे, प्रदेश सचिव थानेश्वर कायरकर, अल्का खोकले, वासुदेव सोंदरकर, मुन्ना रामटेके, पुष्पाकर बांगरे, संदीप बगमारे, गाझी पटेल, सोमेश्वर उपासे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.