वाशीम,
illegal-money-lending वाशीम तालुयातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधी प्राप्त तक्रारीच्या चौकशीदरम्यान करण्यात आलेल्या झडतीत अवैध सावकारी व्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आल्याने सागर ऊर्फ प्रिया दौलत वायचाळ व त्यांची बहिण अल्का दौलत वायचाळ यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत वाशीम शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत ३० सप्टेंबर २०२६ रोजी सागर ऊर्फ प्रिया दौलत वायचाळ व अल्का दौलत वायचाळ, रा. राजगाव, ता. जि. वाशीम, ह.मु. शंकर बाबा रोड, लाखाळा, वाशीम यांच्या निवासस्थानी झडतीची कार्यवाही करण्यात आली होती.
झडतीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या अभिलेखांच्या तपासणीत अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये अवैध सावकारी व्यवहार झाल्याचे तसेच गैरअर्जदारांकडून अवैध सावकारी केली जात असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले. तसेच, व्यवहारासंदर्भात धनादेश व कोरे स्टॅम्पपेपर घेतल्याचेही आढळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची खात्री झाल्याने ईश्वर नारायण काबरा यांना त्यासाठी प्राधिकृत करण्यात आले होते. त्यानुसार ६ ऑटोबर २०२६ रोजी सागर ऊर्फ प्रिया दौलत वायचाळ व त्यांची बहिण अल्का दौलत वायचाळ यांच्याविरुद्ध वाशीम शहर पोलिस ठाण्यात क्रमांक १०५९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम ३९ व ४५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, वाशीम जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारी व्यवहार करणार्या व्यक्तींबाबत सहकार विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अवैध सावकारी व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण व कार्यवाही करण्यासाठी जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशीम तसेच प्रत्येक तालुयातील सावकारांचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रारी दाखल करता येतील. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.असे जिल्हा उपनिबंधक माणिक लटपटे यांनी कळविले आहे.