वर्धा,
district-collectors-orders आगामी काळात पाणी समस्येची झळ बसता कामा नये, यासाठी ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आदेश निर्गमित करून आता उपलब्ध पाणी प्राधान्यक्रमाने मानवांसह जनावरांच्या पिण्यासाठी देण्यात येणार असून शेतीसाठीच्या पाण्याला दुय्यम स्थान देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, जलाशय, नदी, तलाव, बंधारे, कोल्हापूरी बंधारे, विहिरी, बोअरवेल, पाणी पुरवठा योजना तसेच पिण्याच्या पाण्यासाठीचे राखीव साठे यातून विनापरवाना पाण्याचा उपसा झाल्यास पाण्याचे नियोजन विस्कळीत होऊ शकते.

अवैध व नियोजनबाह्य पाणी उपशाचा शोध, तपासणी, पंचनामा, जप्ती व कायदेशीर कारवाईकरिता तालुकास्तरीय विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात अध्यक्ष म्हणून तहसीलदार, सदस्य सचिव म्हणून जलसंपदा वा जलसंधारण विभागाचे उपअभियंता/कनिष्ठ अभियंता तर सदस्य म्हणून संबंधित मंडळ अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी, पाणी पुरवठा किंवा पंचायत समिती तथा नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता, भूजल सर्वेक्षण व विकस यंत्रणेचे प्रतिनिधी, महावितरणचे प्रतिनिधी, संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांचा समावेश करण्यात आला आहे. अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल मंडळ निहायही भरारी पथक तयार करण्यात आली आहेत. या पथकात समन्वयक म्हणून जलसंपदा किंवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, सदस्य म्हणून महावितरणचे शाखा अभियंता, पोलिस उपनिरीक्षक तर आवशक्यतेनुसार संबंधित तलाठी, ग्रामसेवक, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी, जीएसडीएचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
पाणी टंचाईच्या काळात ऊस व पाण्याची अधिक गरज असणा-या पिकांना शेवटचे प्राधान्य देण्यात आले आहे. जलाशय, नदी, तलाव, को. पा. बंधारा किंवा कालव्यामधून मंजूर पाणी नियोजनाच्या बाहेर पाणी उपसा करणे, मंजूर पाणी कोटा, पाळी किंवा पाणी हक्काच्या विरुद्ध पाणी उपसा करणे. पाणी पिण्यासाठी राखीव तलाव, बंधारा, मृतसाठा, गावठाण तलाव किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामधून पंप बसवून शेती, टँकर, व्यावसायिक किंवा अन्य कारणांसाठी अनधिकृत पाणी उपसा करणे. जलाशय, कालवा किंवा इतर जलस्रोतांमधून अनधिकृत सायफनिंग करून पाणी उपसा करणे. सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य अथवा वितरण वाहिनीवर अनधिकृत जोडणी करून शेती, टँकर, व्यावसायिक, आरओ अथवा अन्य कारणासाठी पाणी घेणे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत व्यावसायिक आरओ/ पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर प्लाँटवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.