अनिल कांबळे
नागपूर,
fake-bank-account मशिनरी पुरवठादाराचा ई-मेल हॅक करून त्याच ई-मेलद्वारे बनावट बँक खात्याची माहिती पाठवत बुटीबोरी येथील कंपनीची ३४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिताबर्डी पोलिसांनी अज्ञात सायबर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी इरॉस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे एचआर मॅनेजर अभय सीताराम पांडे (३४) यांनी तक्रार दिली आहे. कंपनीला कामासाठी १ कोटी १५ लाख रुपयांची रोल फॉर्मिंग मशिन खरेदी करायची होती. त्यासाठी कंपनीने नियमित विक्रेता असलेल्या राजकोट येथील डिव्हाइन मशिन्स प्रायव्हेट लिमिटेडशी त्यांच्या अधिकृत ई-मेलवरून संपर्क साधला होता.

विक्रेत्याने मशिनच्या किमतीच्या ३० टक्के रक्कम आगाऊ देण्यास सांगत बँक ऑफ बडोदाच्या खात्याची माहिती असलेले प्रोफॉर्मा इनव्हॉइस पाठविले होते. मात्र, ३० सप्टेंबर रोजी त्याच ई-मेलवरील सुरू असलेल्या पत्रव्यवहारातून कंपनीला बँक खाते बदलल्याचे सांगण्यात आले. आगाऊ रक्कम आता कॅनरा बँकेच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विक्रेत्याकडूनच मेल आल्याचे समजून कंपनीने ३ ऑक्टोबर रोजी आरटीजीएसद्वारे ३४ लाख ५० हजार रुपये संबंधित खात्यात जमा केले. मात्र, ५ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या खरेदी अधिकाऱ्याने विक्रेत्याच्या संचालकाशी संपर्क साधला असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. रक्कम मिळाली नसल्याचे संचालकांनी स्पष्ट केले. तसेच त्यांच्या कंपनीचे कॅनरा बँकेत कोणतेही खाते नसल्याचेही त्यांनी सांगितले. विक्रेत्याचा ई-मेल हॅक झाल्याने त्यातून बँक खाते बदलण्यासंदर्भात कोणताही मेल पाठविण्यात आला नसल्याचेही स्पष्ट झाले. पांडे यांच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्या बँक खात्यात रक्कम वळविण्यात आली त्याचा तपास करून सायबर आरोपींचा माग काढला जात आहे.