पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यथा मांडणाऱ्या धोपच्या शेतकऱ्याची आत्महत्या

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
भंडारा,
guardian-ministers सरकारी कागदावर दुष्काळाची तीव्रता मोजली जाते; पण शेतकऱ्याच्या शेतातला करपलेला धानाचा पेरा आणि त्याच्या डोळ्यातील पाणी कोणत्या मोजपट्टीने मोजायचे? राज्यात दुष्काळाचे सावट असताना भंडारा जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले. मात्र उर्वरित तालुके दुष्काळाच्या यादीतून बाहेर राहिले. याच पार्श्वभूमीवर मोहाडी तालुक्यातील धोप येथील शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी पहाटे विहिरीत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे सरकारी दुष्काळाच्या निकषांपेक्षा शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष जगण्याची परिस्थिती किती वेगळी आहे, हा अस्वस्थ करणारा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
suicide
 
विशेष म्हणजे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या धोप परिसरातील दौऱ्यावेळी सपाटे यांनी स्वतःची आणि शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली होती. शेतकऱ्याची अडचण थेट पालकमंत्र्यांसमोर पोहोचली होती. मग त्यानंतर काय झाले? त्या तक्रारीची नोंद झाली का? संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याशी संपर्क साधला का? त्याच्या मागण्यांवर काही निर्णय झाला का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्याने मदतीची हाक दिली होती, त्याचा आवाज मदतीपूर्वीच का हरवला?
 
 
सपाटे यांच्या आत्महत्येची कारणे अधिकृत चौकशीतून स्पष्ट होतील. मात्र त्यांच्या मृत्यूने मोहाडी–तुमसर परिसरातील शेतीसमोरील संकटाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पावसाची अनिश्चितता, पिकांची अवस्था, उत्पादनाचा खर्च, हातात न येणारे उत्पन्न आणि कर्जाचा वाढता ताण या सगळ्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशा वेळी एखादा तालुका सरकारी दुष्काळाच्या यादीत आहे किंवा नाही, यापेक्षा त्या तालुक्यातील शेतकऱ्याची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
 
 
राजेंद्र सपाटे यांच्या मृत्यूने हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. त्यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांनी मांडलेल्या प्रश्नांची प्रशासनाने कोणती दखल घेतली, याचा तपशील समोर येणे गरजेचे आहे. त्यांच्या कुटुंबाला तातडीची मदत मिळण्याबरोबरच आत्महत्येच्या परिस्थितीची सखोल चौकशी झाली पाहिजे. दुष्काळाची सरकारी घोषणा तीन तालुक्यांपुरती मर्यादित असली, तरी शेतकऱ्याच्या संकटाला तालुक्याची सीमा नसते. सपाटे यांच्या मृत्यूने उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचेही तातडीने पुनर्मूल्यांकन करण्याची आहे.