पतीच्या जाचाला कंटाळून आरोग्य सेविकेची आत्महत्या

उब्दा येथील आरोग्य विभागाच्या क्वॉर्टरमधील घटना

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
समुद्रपूर,
health-worker-commits-suicide तालुक्यातील उब्दा येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविकेने आरोग्य विभागाच्या क्वॉर्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ रोजी उघडकीस आली. मात्र, ही आत्महत्या तिने पतीच्या जाचाला कंटाळून केल्याची तक्रार मृतक आरोग्य सेविकेची मोठी बहीण कल्पना मडावी हिने समुद्रपूर पोलिसात केली असून पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरिता परचाके-खुरसंगे असे आत्महत्या केलेल्या आरोग्य सेविकेचे नाव आहे.
 
 
health-worker-commits-suicide
 
मिळालेल्या माहितीनुसार, सरिताचे लग्न सन २०१५ मध्ये मूळ सातेफळ येथील आशिष खुरसंगे याच्यासोबत झाले. सध्या तो वर्धा येथे वास्तव्यास आहे. सरिता हिला १० वर्षांची काव्या आणि २ वर्षांचा स्वरुप अशी दोन मुलं आहेत. सरिता ही उबदा येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होती. मागील दोन वर्षापासुन ती आरोग्य विभागाच्या क्वॉर्टरमध्ये कुटुंबासह राहत होती. परंतु, मुलांच्या शिक्षणाकरिता वर्धा येथून येणे-जाणे करायची. सरिताचा पती आशिष खुरसंगे याला दारूचे व्यसन होते. लग्न झाल्यापासून आशिष तिच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद करायचा. सरिताला नेहमी दारू पिण्याकरिता पैसे मागायचा मात्र, पैसे न दिल्यास मारहाणही करायचा, अशी आपबिती ती आपल्याकडे मांडत असल्याचेही कल्पनाने तक्रारीत नमूद केले. पतीच्या या त्रासाला ती कंटाळली होती. दरम्यान, ७ रोजी तिने टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार सरिताची मोठी बहीण कल्पना मडावी हिने दिली.
 
या घटनेबद्दल मला माहिती मिळताच मी पतीसोबत उब्दा गाठले त्यावेळी समुद्रपूर पोलिसांनी शव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेले होते. रुग्णालय गाठले असता सरिताच्या नाकातोंडातून रक्त निघत होते. चेहर्यावर ओरखडे दिसून आले. काही वेळाने सरिताच्या पतीने तिला मारहाण केल्याचे कळल्याचेही कल्पनाने तक्रारीत नमूद केले. तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शरद आवारे, विकी मस्के, संभाजी मूलकर करीत आहेत.