वाशीम,
maha-vikas-aghadi मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात तात्काळ कार्यवाही करून त्यांना अटक करावी, तसेच एसआयआर रद्द करावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवार, ८ ऑटोबर रोजी वाशीम शहरात काढण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू चौधरी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात महाविकास आघाडीसह विविध समविचारी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार २ ते ८ ऑटोबरदरम्यान जिल्हास्तरावर ‘लोकशाही वाचवा सप्ताह’ तसेच ‘मत वाचवा—देश वाचवा’ अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मोटारसायकलवरून मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. मोर्चादरम्यान ‘ज्ञानेशकुमार हटाव, देश बचाव’,‘एसआयआर रद्द करा’ यासह विविध घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने विविध पक्षांच्या संयुक्त स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानातील कलम ३२६ चे सार्वजनिक वाचन करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान ज्ञानेशकुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून व पायदळी तुडवून निषेध करण्यात आला.
या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी, अॅड. दिलीप सरनाईक, डॉ. सिध्दार्थ देवळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष अमित खडसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू किडसे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, समनक जनता पार्टीचे गजानन धामणे, गजानन देशमुख, सुधीर कव्हर, किसन मस्के, कॅ. प्रशांत सुर्वे, राजू भांदुर्गे, परसराम भोयर, वैभव सरनाईक, मधुकर जुमडे, दिलीप देशमुख, गजानन गोटे, नंदा गनोदे, मीना वाठोरे, प्रकाश कांबळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सरचिटणीस उज्वल देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव सुरेश रत्नपारखी यांनी केले. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप करण्यात आला.