महाराष्ट्राचे जन्मलिंग गुणोत्तर ९१०वर

मुलींच्या जन्माचे प्रमाण चिंताजनक

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
मुंबई
maharashtra sex ratio गर्भलिंगनिदान आणि त्यानंतर होणाऱ्या गर्भपातांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असतानाही महाराष्ट्रातील जन्मलिंग गुणोत्तरात झालेली घट चिंताजनक ठरत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये ९१२ असलेले राज्याचे जन्मलिंग गुणोत्तर २०२५ मध्ये दोन अंकांनी घटून ९१०वर आले आहे. दर एक हजार मुलांमागे जन्मलेल्या मुलींची संख्या म्हणजे जन्मलिंग गुणोत्तर होय.
 

maharashtra sex ratio 
अमरावती, यवतमाळ, मुंबई, जालना, वाशीम, धाराशीव, वर्धा, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या १५ जिल्ह्यांत हे प्रमाण घटले आहे. धुळ्यात सर्वाधिक ६१ अंकांची घसरण झाली असून, जन्मलिंग गुणोत्तर ९३६वरून थेट ८७५वर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ९२८वरून ८८६, अहिल्यानगरमध्ये ८७८वरून ८४६, नंदुरबारमध्ये ९६७वरून ९४३, कोल्हापुरात ८८५वरून ८६२ आणि साताऱ्यात ९०९वरून ८८९ अशी घट झाली आहे. मुंबईतील प्रमाणही ९४६वरून ९३८वर आले आहे.
दुसरीकडे, ठाणे, लातूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रायगड, गोंदिया, रत्नागिरी, नागपूर, भंडारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, सांगली, परभणी, चंद्रपूर आणि पुणे या जिल्ह्यांत जन्मलिंग गुणोत्तरात वाढ झाली आहे. गडचिरोलीत हे प्रमाण ९५५वरून ९९८पर्यंत वाढले, तर लातूरमध्ये ८९४वरून ९५५ आणि ठाण्यात ८५५वरून ९३० झाले आहे. नागपुरातही ९२८वरून ९५० अशी सुधारणा नोंदवली गेली आहे.
राज्यातील जन्मलिंग गुणोत्तराची नोंद नागरी नोंदणी प्रणालीच्या माध्यमातून केली जाते. गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची अंमलबजावणी केली जात असली, तरी काही ठिकाणी कायद्याच्या अंमलबजावणीतून पळवाटा शोधल्या जात असल्याचे निरीक्षण आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या काळात आरोग्य विभागाने डिकॉयच्या माध्यमातून ३८ स्टिंग ऑपरेशन्स केली. त्यापैकी नऊ कारवायांमध्ये गर्भलिंगनिदानाशी संबंधित गैरप्रकार उघडकीस आले.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पीसीपीएनडीटी’ हेल्पलाइनवर जानेवारी २०२६पासून आतापर्यंत ३२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ११ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून २१ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत.
दरम्यान, दुष्काळाच्या maharashtra sex ratio  पार्श्वभूमीवर या परिस्थितीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज सामाजिक अभ्यासक प्रा. एस. व्ही. मोहिते यांनी व्यक्त केली आहे. स्थलांतर, बालविवाह आणि कमी वयात होणारी प्रसूती हे घटक एकमेकांशी संबंधित असल्याने आगामी काही वर्षांत त्याचा परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे ‘लेक लाडकी’चा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत प्रत्यक्षात कितपत पोहोचला आहे, हा प्रश्न या आकडेवारीमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.