आयपीएल २०२७ पूर्वी पंजाब किंग्सला मोठा धक्का

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
ipl-2027 आयपीएल २०२७ च्या आगामी हंगामापूर्वी पंजाब किंग्स फ्रँचायझीला मोठा झटका बसला असून, मुख्य प्रशिक्षक रिकी पोंटिंग यांच्या मार्गदर्शनाखालील कोचिंग स्टाफमधील महत्त्वाच्या सदस्यांनी फ्रँचायझीची साथ सोडली आहे. वृत्तसंस्था क्रिकबजच्या अहवालानुसार, पंजाब किंग्सचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ब्रॅड हैडिन यांनी अलीकडेच फ्रेंचायझीला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. या दोन्ही ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांना बिग बॅश लीगमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
ipl-2027
 
माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स होप्स हे रिकी पोंटिंग यांचे अत्यंत जवळचे मानले जातात आणि पोंटिंगसोबतच ते दिल्ली कॅपिटल्समधून पंजाब किंग्समध्ये दाखल झाले होते. दुसरीकडे, माजी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज ब्रॅड हैडिन हे ट्रेवर बेलिस फ्रँचायझीचे मुख्य असतानापासून कोचिंग सेटअपचा भाग म्हणून काम पाहत होते. यापूर्वी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनीही आयपीएलच्या १९ व्या हंगामाच्या समाप्तीनंतर पंजाबची साथ सोडली होती. बहुतुले यांनी यापूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये काम केले असून त्यांनी सुनील जोशी यांची जागा घेतली होती, जे नंतर बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक झाले.
 
या सलग बदलांमुळे रिकी पोंटिंग यांच्या समोरील अडचणी वाढल्या असून, पंजाब किंग्सला आता आगामी हंगामापूर्वी तीन नवीन प्रशिक्षकांची शोधमोहीम हाती घ्यावी लागत आहे. फ्रँचायझी व्यवस्थापन पोंटिंगच्या सतत संपर्कात असून काही संभाव्य नावांवर चर्चा सुरू आहे, परंतु नव्या सपोर्ट स्टाफच्या नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय मुख्य प्रशिक्षक रिकी पोंटिंग हेच मुलाखती आणि चर्चेनंतर घेणार आहेत. फ्रँचायझीचा असा मानस आहे की, डिसेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल लिलावापूर्वीच नवीन कोचिंग स्टाफची घोषणा करून संपूर्ण यंत्रणा अंतिम केली जावी.