आरमोरी,
mla-ramdas-masram नागपूर विभागातील शासकीय धान खरेदी केंद्रांच्या विविध अडचणी दूर करून धान उत्पादक शेतकर्यांना वेळेत धान विक्रीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच धान विक्रीनंतरचे चुकारे व बोनस शेतकर्यांच्या खात्यावर वेळेत जमा करावेत. यासोबतच संस्थाचालकांचे थकीत गोदाम भाडे व हमालीची रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत केली.
या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण नागपूर विभागातील धान उत्पादक शेतकरी, हमाल आणि संस्था चालकांना भेडसावणार्या विविध अडचणी आमदार रामदास मसराम यांनी ठामपणे मांडल्या. शासकीय धान खरेदी केंद्रांवरील अडचणींमुळे शेतकर्यांना धान विक्री करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, धान विक्रीनंतरही चुकारे व बोनस मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकर्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसेच धान खरेदी केंद्रांवर धानाची वेळेत उचल होत नसल्यामुळे गोदामांची उपलब्धता, साठवणूक आणि वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. याचा फटका संस्थाचालकांनाही बसत असून, त्यांचे गोदाम भाडे आणि हमालीची रक्कम मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. त्यामुळे संस्थाचालकांवर आर्थिक भार पडत असून, त्यांच्या थकीत देयकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक असल्याचे आमदार मसराम यांनी म्हटले. धान खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे, धानाची वेळेत उचल करणे, शेतकर्यांचे चुकारे व बोनस विनाविलंब अदा करणे तसेच संस्थाचालकांचे गोदाम भाडे आणि हमालीची थकीत रक्कम तातडीने देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी केली.