मुंबई
mumbai siren test मुंबई शहरात गुरुवार, ८ आणि शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायरन यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. फोर्ट परिसरातील जुने सचिवालय आणि क्रॉस मैदानाजवळील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतींवर बसविण्यात आलेल्या सायरनची ही पूर्वनियोजित चाचणी आहे. त्यामुळे या दोन दिवसांत मुंबईकरांना सायरनचा आवाज ऐकू येऊ शकतो. मात्र, या आवाजाचा कोणत्याही प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीशी संबंध नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कधीकाळी मुंबईतील गिरण्यांचे भोंगे हा शहराच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होते. गिरण्यांमधील कामगारांच्या शिफ्ट या भोंग्यांच्या आवाजानुसार सुरू होत असत. भोंगा किती वाजता वाजला, यावरून अनेक मुंबईकर आपल्या रोजच्या कामकाजाची सुरुवात करत. मात्र १९८२ मधील गिरणी संपानंतर हा आवाज कायमचा थांबला. त्यानंतर मुंबईच्या बदलत्या रूपात जुन्या गिरण्यांच्या चिमण्या मात्र आजही काही ठिकाणी इतिहासाच्या खुणा म्हणून दिसतात. काही चिमण्यांवर पिंपळासह इतर झाडांनीही आपला ताबा मिळवला आहे.
अशा बदललेल्या मुंबईत आता अनेक दशकांनंतर पुन्हा सायरनचा आवाज ऐकू येणार आहे. मुंबईकर लोकलच्या हॉर्नसह शहरातील वाढत्या बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला सरावलेले असले, तरी या सायरनचा आवाज त्यांच्या लक्षात येईल का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र प्रशासनाने नागरिकांना या चाचणीबाबत आधीच माहिती देत कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन केले आहे.
माननीय महासंचालक, नागरी संरक्षण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स अर्थात सी-डॉटच्या पथकाने प्रोटोटाइप सायरन उपकरण तयार केले आहे. हे उपकरण मुंबईतील फोर्ट परिसरातील जुने सचिवालय आणि जोड इमारत तसेच क्रॉस मैदान येथील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतीवर बसविण्यात आले आहे. या यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही चाचणी पूर्णपणे नियोजित असून मुंबईत सध्या कोणतीही आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका निर्माण झालेला नाही. त्यामुळे सायरनचा आवाज ऐकू आल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा कोणताही गैरसमज करून घेऊ नये.
चाचणीदरम्यान mumbai siren testनागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अनधिकृत माहितीवर अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे. त्यामुळे ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या काही भागांत सायरनचा आवाज ऐकू आल्यास त्याला आपत्तीचा इशारा समजू नये. ही केवळ सायरन यंत्रणेची पूर्वनियोजित चाचणी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.