नागपूर
nagpur central jail नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना सोमवारी सकाळी घडली. कारागृह आवारातील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन बराकीकडे परतणाऱ्या विचाराधीन कैद्यावर सहकैद्यांनी हल्ला केला. या घटनेत कैदी जखमी झाला. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणताना एका कैद्याने सुरक्षारक्षकासोबत हुज्जत घालत अधिकाऱ्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय ऊर्फ विजू रहांगडाले हा बराक क्रमांक ७ आणि ८ परिसरातून जात असताना दुर्गेश गुप्ता आणि अश्विन इंदुरकर यांनी त्याला घेरले. यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर दोघांनी विजयच्या डोक्यात प्लॅस्टिकची बादली घातली. या हल्ल्यात विजय जखमी झाला. त्याला तातडीने कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेदरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी सुरेंद्र ऊर्फ मोनू समुद्रे याने सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली. तसेच एका अधिकाऱ्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जेल सिपाही nagpur central jail मनोज धनवट यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी विजयवर हल्ला करणाऱ्या दुर्गेश गुप्ता, अश्विन इंदुरकर तसेच सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालणाऱ्या सुरेंद्र ऊर्फ मोनू समुद्रे या तिन्ही कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास धंतोली पोलीस करीत आहेत.