अनिल कांबळे
नागपूर,
nagpur central jail मध्यवर्ती कारागृहामध्ये न्यायाधीन कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर पाचपावली पोलिसांनी मकोका प्रकरणातील दोन आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले. दुर्गेश ऊर्फ लिटल प्रमोद गुप्ता आणि अश्विन ऊर्फ अच्छी मुकुंद इंदुरकर अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध पाचपावली पोलिस ठाण्यात यापूर्वीच मकोकाचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मागील मंगळवारी सकाळी सेंट्रल जेल परिसरातील मंदिरातून न्यायाधीन कैदी विजय नंदलाल रहांगडाले हा बॅरेकमध्ये परतत होता. त्यावेळी दुर्गेश आणि अश्विन यांनी त्याच्याशी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत विजय जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कारागृह कर्मचारी मनोज धनवट यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आणखी एक विचाराधीन कैदी सुरेंद्र ऊर्फ मोनू मनोज समुद्रे याने कारागृह कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांच्यावर झेप घेतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर धंतोली पोलिस ठाण्यात दुर्गेश, अश्विन आणि सुरेंद्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुर्गेश आणि अश्विन यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, पाचपावली पोलिसांनी मकोका प्रकरणाच्या तपासासाठी दोघांचा प्रॉडक्शन वॉरंट मागितला. न्यायालयाच्या आदेशानंतर दोघांना सेंट्रल जेलमधून बाहेर काढून पोलिसांनी ताब्यात घेतले. सहायक पोलिस आयुक्त पारवे हे मकोका प्रकरणाचा तपास करीत आहेत.