बनावटी नंबर प्लेटचा मोठा 'खेळ बेनकाब'

एकाच नंबरवर धावत होते चार ट्रक; दोघे अटकेत, एक फरार

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
प्रणव सातोकर
नागपूर,
fake number plate scam कलमना मार्केट परिसरात एकाच वाहन क्रमांकाची फर्जी नंबर प्लेट चार ट्रकवर लावून वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्राइम ब्रँचच्या वाहन चोरीविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत चार ट्रक तसेच त्यामध्ये असलेले पारले-जी बिस्किट आणि तांदळाचे एकूण २१० पोते असा सुमारे ५५ लाख १० हजार १७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे.
 

nagpur fake number plate scam one registration number used on four trucks, two arrested 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२.५० ते २.३० वाजण्याच्या सुमारास कलमना मार्केट परिसरातील पार्किंगमध्ये तपासणी सुरू असताना हा प्रकार निदर्शनास आला. तपासणीदरम्यान एका आयशर ट्रकचा अधिकृत क्रमांक एमएच-४०/सीटी-८६८३ असल्याचे समोर आले. मात्र, याच क्रमांकाची फर्जी नंबर प्लेट तयार करून ती आणखी तीन ट्रकवर लावण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन आयशर प्रो १११०, एक टाटा ११०९ आणि एक आयशर प्रो २११० असे चार ट्रक ताब्यात घेतले. या वाहनांमध्ये पारले-जी बिस्किट आणि तांदळाची एकूण २१० पोती आढळून आली.
या प्रकरणात राजेंद्र सिंह सतनाम सिंह रंधावा (५१) आणि सुखदेव सिंह राजेंद्र सिंह रंधावा (२४) यांना अटक करण्यात आली आहे. तर रायपूर, छत्तीसगड येथील शिवा सिंह लक्ष्मण जाधव हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी संगनमत करून फर्जी नंबर प्लेट तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून विविध ट्रकवर लावली. तसेच योग्य नोंदणीशिवाय वाहने रस्त्यावर चालविल्याचा संशय आहे. या प्रकरणी कलमना पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.