‘नाना गेले...’आज एका युगाचा अस्त झाला’

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
मुंबई
nana patekar हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. गोव्यात त्यांनी पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर होते. मात्र, ‘नाना’ या नावानेच ते चित्रपटसृष्टीत आणि रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून राहिले. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त होत असून अभिनेता रितेश देशमुख यानेही भावनिक पोस्ट करत नानांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
 
 

nana patekar death: ritesh deshmukh says “an era has ended” in emotional tribute 
नाना पाटेकर यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी : द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. पडद्यावर विविध छटा साकारताना त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. अभिनयासोबतच सामाजिक कार्यालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत नाना पाटेकर सातत्याने संवेदनशील राहिले. आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू शेतकरी आणि कुटुंबांना मदतीचा हात दिला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख केवळ अभिनेते म्हणून न राहता सामाजिक भान जपणारा कलाकार अशीही निर्माण झाली.नाना पाटेकर हे अनेक कलाकारांसाठी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. रितेश देशमुखनेही नानांसोबत काम केले होते. ‘ब्लफमास्टर’ आणि ‘हाउसफुल ५’ या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र पडदा शेअर केला. नानांसोबत एका मराठी चित्रपटात काम करण्याची रितेशची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.नानांच्या निधनानंतर रितेशने सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावना अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. नाना गेल्याची बातमी ऐकून मन सुन्न झाले असून, जणू काळजावर वीज कोसळल्यासारखे वाटत असल्याचे त्याने म्हटले. नाना हे अभिनयाच्या आकाशातील असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, असेही रितेशने नमूद केले.
 
 
नानांच्या अभिनयातील विविध पैलूंची आठवण काढताना रितेशने त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला सलाम केला. पडद्यावर कधी प्रभावी नायक, कधी अंगावर काटा आणणारा खलनायक, तर कधी गंभीर व्यक्तिमत्त्वामागे दडलेला विनोद अशा असंख्य छटा नानांनी आपल्या अभिनयातून साकारल्या. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी स्वतःची वेगळी ओळख दिली, असे रितेशने म्हटले.
रितेशच्या मते, nana patekar  नाना पडद्यावर जितके मोठे कलाकार होते, त्यापेक्षा पडद्यामागे माणूस म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक मोठे होते. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून माणुसकीची सेवा सुरू होती. त्यामुळे नानांचे सामाजिक योगदानही त्यांच्या कलात्मक वारशाइतकेच महत्त्वाचे असल्याचे रितेशने अधोरेखित केले.
नानांसोबत घालवलेल्या वैयक्तिक क्षणांचाही रितेशने आवर्जून उल्लेख केला. त्यांचे बोलणे, गप्पा, पाठीवर मिळणारी कौतुकाची थाप आणि त्यांच्यासोबत केलेले मनमोकळे हास्य या आठवणी आपल्या आयुष्यातील अमूल्य ठेवा असल्याचे त्याने म्हटले. नानांसोबत काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना रितेशने व्यक्त केली.
नानांच्या कुटुंबीयांसह आप्तेष्ट आणि त्यांच्या लाखो चाहत्यांप्रती रितेशने संवेदना व्यक्त केल्या. नाना पाटेकर यांचे निधन म्हणजे केवळ एका अभिनेत्याचा मृत्यू नसून एका युगाचा अस्त असल्याची भावना व्यक्त करत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या.