निवडणूक आयोगावर विश्वास उरला नाही : अनिल देशमुख

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
वाशीम,
anil-deshmukh ‘मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. मात्र, मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नामुळे जनतेचा तसेच राजकीय पक्षांचा निवडणूक आयोगावरील विश्वास कमी झाला आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला.
 
 
anil-deshmukh
 
देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, स्वायत्त संवैधानिक संस्थांचे अस्तित्व आणि महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थिती या मुद्यांवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाशीम येथे पत्रकार परिषद घेत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. पत्रकार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले.निवडणूक आयोगासारख्या सर्वोच्च संवैधानिक संस्थेतील इतर आयुक्तांची मते व कायदेशीर आक्षेप बाजूला सारून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील संबंधित प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशा मागण्या मांडल्या. तसेच आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना देशमुख यांनी राज्य सरकारवरही टीका केली. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकर्‍यांना प्रत्यक्षात किती आणि कोणत्या स्वरूपाची मदत मिळणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे त्यांनी म्हटले.
 
 
खासदार शरद पवार यांनी राज्य शासनाकडे मांडलेल्या १७ तातडीच्या मागण्यांचा उल्लेख करत देशमुख म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना सरसकट मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पंचनाम्यांच्या औपचारिकतेत वेळ न घालवता प्रति हेटरी १ लाख रुपये, तीन हेटरपर्यंत सरसकट मदत देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. शासनाने शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, जिल्हाध्यक्ष अमित खडसे, इमरानभाई फकीरावाले, सुमित पाटील, रमेश गोटे, ज्योती गणेशपुरे, वैशाली मेश्राम, कैलास खानझोडे, गणेश मापारी आदी उपस्थित होते.