अनिल कांबळे
नागपूर,
vishwas-nangare-patil मुंबई शहरात गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी वेगळी सिस्टीम वापरण्यात येते. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक कायम राहावा म्हणून गुन्हेगारांवरांच्या हालचालींवर वॉच ठेवण्यात येतो. त्यामुळे अनेक गुन्हे घडण्यापूर्वी टाळता येतात. त्याच पद्धतीने आता नागपुरातसुद्धा मुंबईच्या धर्तीवर गुन्हेगारांवर पाळत ठेवून तसेच आदान-प्रदान पद्धतीचा सकारात्मक वापर करुन गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात येईल. गुन्हेगारी नियंत्रणासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन आणि कुणाचीही हयगय न करता धडक कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले. ते गुरुवारी सकाळी प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मिट द प्रेस’ या कार्यक्रमात बोलत होते.
नांगरे पाटील पुढे म्हणाले की, शहराची सीमा आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या प्रमाणात पोलिसांची संख्या तेवढीच आहे. नागपुरात सामाजिक सलोखा असल्यामुळे धार्मिक दंगलीसारखे गुन्हे घडत नाहीत. अन्य आयुक्तालयाच्या तुलनेत नागपुरातील गुन्हेगारी कमीसुद्धा झालेली आहे. नागपुरात छोटे गुन्हेगार भविष्यात मोठे गुन्हेगार होऊ नये म्हणून समुपदेशनाच्या माध्यमातून आम्ही ॲक्शन घेत आहोत. तसेच क्रिमिनल सॉयकॉलॉजीवरही आम्ही काम करीत आहेत. महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेवर आमचे लक्ष आहे. महिला सुरक्षेसाठी शहरात १२ निर्भया पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
... तर अल्पवयीन आरोपींवरही कारवाई
खून, बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलांवरसुद्धा अन्य आरोपींप्रमाणे कारवाई करण्यात यावी. समाज, आईवडिल आणि पालकांची जबाबदारी फिक्स करुन बालगुन्हेगारी रोकण्याचे आव्हान आहे. समूपदेशनाच्या माध्यमातून अल्पवयीन यांना गुन्हेगारीच्या क्षेत्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लहान मुलांना ड्रग्ज, हुक्का आणि अमली पदार्थ्यांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मुलांच्या सोशल मीडियावर वॉच ठेवणे सुरु असून गुन्हेगारांच्या संपर्कात असलेल्या मुलांचा फॉलोअप घेण्यात येत आहे.
वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष
येत्या काही दिवसांत शहरातील वाहतूक व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यात येणार आहे. मनपा आणि पोलिस यांची संयुक्त धडक कारवाई सुरु करण्यात येणार नाही. फुटपाथवर दुकान लावल्यास किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा वस्तू फुटपाथवर ठेवल्यास थेट गुन्हे दाखल करुन खटला भरविण्याचा प्रयत्न आहे. रस्ते अपघात रोकण्यावर आमचा भर आहे.
‘ड्रग्ज फ्री नागपूर सीटी’
नागपुरात ड्रग्ज विक्री आणि तस्करीची साखळी तोडण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी आम्ही एनडीपीएस पथकात पोलिसांची संख्या वाढवणार आहे. ड्रग्जच्या विळख्यात युवा वर्ग आहे. त्यामुळे तस्करांवर आणि पेडलर यांच्यावर कारवाईचा धडाका लावणार आहे. अवैध दारुविक्री आणि गांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच सायबर गुन्हेगारी रोकण्यावर भर आहे. सायबर आणि आर्थिक वींगमध्ये एक्स्पर्ट असलेल्या कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात येणार आहे.