वर्धा,
rescues-minor-girlसेवाग्राम रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिला चाइल्ड हेल्प लाइनच्या स्वाधीन करण्यात आले.
५ ऑक्टोबर रोजी डाउन केरळ एक्स्प्रेस सेवाग्राम स्थानकावरून रवाना झाल्यानंतर प्रधान आरक्षक प्रमोद दैने फलाटावर गस्त करत असताना सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता त्यांना फलाट क्रमांक ३ वर एका मुलासोबत एक मुलगी स्टीलच्या बाकावर बसलेली दिसली. दोघांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे दोघांना सेवाग्राम येथील आरपीएफच्या चौकीत आणण्यात आले.
चौकशीदरम्यान दोघांच्या जबाबांमध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्याने उपनिरीक्षक बी. एस. बघेल यांना माहिती देण्यात आली. चौकीत सविस्तर चौकशी केली असता मुलीचे वय १६ वर्षे असल्याचे समोर आले. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ती संबंधित युवकाला ओळखत असून दोघेही ४ ऑक्टोबर रोजी घरच्यांना न सांगता हैदराबादला गेले होते. तेथे काम न मिळाल्याने ते परत भोपाळला जाण्यासाठी निघाले. प्रवासादरम्यान गर्दी असल्याने ते चंद्रपूर स्थानकावर उतरले.
त्यानंतर केरळ एक्स्प्रेसने सेवाग्रामला आले. सेवाग्राम स्थानकावर पाणी घेण्यासाठी ते रेल्वेतून खाली उतरले. मात्र, गर्दीमुळे त्यांना पुन्हा गाडीत चढता आले नाही अशी माहिती आरपीएफच्या जवानांना दिले. त्यानंतर चाइल्ड हेल्पलाइन यांना माहिती देण्यात आली. शिवाय मुलीची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर मुलीला सुरक्षितपणे चाइल्ड हेल्प लाइनच्या स्वाधिन करण्यात आले.