मुंबई
Rohit Pawar ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांनी सामाजिक कार्यातूनही वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेषतः आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यापासून ते दुष्काळ आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यापर्यंत त्यांनी सातत्याने काम केले. राज्यात किंवा देशात कोणतीही गंभीर समस्या निर्माण झाली की नाना त्यावर परखडपणे आपले मत मांडत असत. पुण्यात सध्या सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही ते पाठिंबा देणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ही माहिती दिली. नानांच्या निधनाची आठवण सांगताना रोहित पवार यांना भर कार्यक्रमात अश्रू अनावर झाले.
रोहित पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी नानांशी अवघ्या तीन दिवसांपूर्वी फोनवरून संवाद झाल्याचे सांगितले. नाना पाटेकर आज दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले. कलाक्षेत्रात त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या अनेक भूमिका आणि चित्रपट गाजले. मात्र, त्यांच्या चित्रपटांमधून केवळ मनोरंजन नव्हे, तर सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न कायम दिसून आला. समाजाला काहीतरी चांगला संदेश मिळावा, अशी त्यांची भूमिका असायची, असे रोहित पवार यांनी सांगितले.
सकाळी उठल्यानंतर नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि मोठा धक्का बसला. नानांचे आमच्या कुटुंबाशी जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांची अशी अचानक आणि अकाली झालेली एक्झिट अत्यंत वेदनादायी असल्याची भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली.
नानांशी तीन दिवसांपूर्वी झालेल्या संवादाची आठवणही रोहित पवार यांनी सांगितली. एका मित्राच्या माध्यमातून त्यांनी नानांना फोन करून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येण्याची विनंती केली होती. त्यावेळी नानांनी दिलेले उत्तरही रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ‘तुला सांगायची गरज नाही. हे सर्व विद्यार्थी आपलेच आहेत,’ असे नाना पाटेकर यांनी म्हटले होते. त्यामुळे नाना विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देणार होते, अशी माहिती समोर आली आहे.
नाना पाटेकर सामाजिक कार्याबाबतही अत्यंत संवेदनशील होते. ग्रामीण भागात आपण जे काही काम करतो, ते समाजासाठीच करतो, असे ते नेहमी सांगायचे. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, तिथे ओढे खोलीकरणाचे काम केले जात असल्याचे ते सांगत. एखादे काम वरकरणी छोटे वाटले, तरी त्यातून पाणी अडल्यास चार-पाच शेतकऱ्यांच्या विहिरी भरू शकतात आणि त्याचा थेट फायदा गावकऱ्यांना होतो, अशी त्यांची भावना होती.
गावागावांत लोकांना भेटताना मिळणाऱ्या आपुलकीचाही नाना पाटेकर आवर्जून उल्लेख करायचे. सामाजिक कामासाठी ग्रामीण भागात गेल्यानंतर लोकांकडून मिळणारे प्रेम आणि जिव्हाळा आपल्याला नवी प्रेरणा देतो, असे ते म्हणायचे. घरात आर्थिक परिस्थिती नसली तरी गावकरी आपल्या शेतात आणि घरात पिकणारी ज्वारी, तांदूळ, बाजरी प्रेमाने बांधून देतात. त्याची पैशांत किंमत करता येत नाही; मात्र त्या आपुलकीची आणि प्रेमाची किंमत खूप मोठी आहे, असे नाना सांगत असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले.
नाना आज असते तर महाराष्ट्रात सुरू असलेल्या घडामोडींवर त्यांनी नक्कीच परखड प्रतिक्रिया दिली असती, असे रोहित पवार यांनी सांगितले. नानांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबीयांसोबत पवार कुटुंब उभे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर एमपीएससीसाठी आंदोलन करणारे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थीही नाना पाटेकर यांच्या कुटुंबासोबत असल्याचे त्यांनी म्हटले.
नानांनी आयुष्यभर जपलेला विचार, संघर्षाची भूमिका, रोखठोकपणा आणि अन्यायाविरोधात थेट भूमिका घेण्याची त्यांची पद्धत हीच पुढे नेण्याचे काम एमपीएससीचे विद्यार्थी करतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. हे सांगत असतानाच नानांच्या आठवणीने त्यांना भावना अनावर झाल्या.