वाजेंच्या महागड्या गाड्यांवर उच्च न्यायालयाची भुवई उंचावली

एपीआयकडे मर्सिडीज कशी?

    दिनांक :08-Oct-2026
Total Views |
मुंबई
sachin waze एंटीलिया बॉम्बप्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे याचा जामीन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने वाजेच्या आर्थिक व्यवहार आणि त्याच्या वापरातील महागड्या वाहनांबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली. तपासादरम्यान समोर आलेल्या साक्षीदारांच्या जबाबांमध्ये वाजेच्या वापरातील आलिशान गाड्या, पंचतारांकित हॉटेलमधील दीर्घ मुक्काम तसेच त्याच्या जीवनशैलीचा उल्लेख वारंवार होत असल्याने न्यायालयाने या बाबींची दखल घेतली.
 

sachin waze 
न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी तपासादरम्यान नोंदविण्यात आलेल्या साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर वाचून दाखवले. यामध्ये २०२१ मधील एका घटनेचाही संदर्भ होता. वाजेला प्रकरण हाताबाहेर जाण्याची आणि एनआयए तपास सुरू करण्याची शक्यता जाणवल्यानंतर त्याने सहकाऱ्यांसह मोबाइल फोन तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे नष्ट करून ती मिठी नदीत फेकून देण्याबाबत चर्चा केल्याचे एका साक्षीदाराच्या जबाबात नमूद असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
अनिल सिंह यांनी आणखी एका साक्षीदाराचा जबाब वाचताना सांगितले की, वाजेने सहकाऱ्यांना सोबत येण्यास सांगितल्यानंतर सर्वजण खाली आले आणि काळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये बसले. वाहनात बसल्यानंतर वाजेने सर्वांना मोबाइल फोन बंद करण्यास सांगितले, असेही साक्षीदाराने नमूद केले होते.
हा संदर्भ समोर आल्यानंतर न्यायालयाने ही मर्सिडीज नेमकी कोणाच्या मालकीची होती, असा सवाल केला. ती वाजेची स्वतःची गाडी होती का, तसेच तिची नोंदणीही त्याच्याच नावावर होती का, अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यावर अनिल सिंह यांनी ही गाडी वाजेची असल्याचे सांगितले. यानंतर खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला मर्सिडीजसारख्या आलिशान वाहनातून फिरताना सहसा पाहायला मिळत नाही.
 
 
अनिल सिंह यांनी अशा वाहनांचा वापर करणारे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने एखाद्या पोलीस महानिरीक्षकाकडेही मर्सिडीज असते का, असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना सिंह यांनी कदाचित आयजींकडेही अशी गाडी नसेल, इतकेच नव्हे तर पोलीस आयुक्तांकडेही ती नसू शकते; मात्र सहायक पोलीस निरीक्षकाकडे मर्सिडीज असू शकते, असे सांगितले. कोणत्या पदावरील अधिकाऱ्याकडे कोणते वाहन असावे, असा नियम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावर न्यायालयाने अशा बाबींकडे पोलीस आयुक्तांनीही लक्ष देणे आवश्यक असल्याचे म्हटले.
 
 
मात्र, वाहन प्रत्यक्षात वाजेच्याच sachin waze मालकीचे होते का, हे प्रथम तपासणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. गणवेशातील एखाद्या व्यक्तीवर गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप होत असेल, तर त्या आरोपाचा संपूर्ण संदर्भ समजून घेण्यासाठी संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे, असे खंडपीठाने नमूद केले. त्याची नोकरीतील प्रामाणिकता, कामकाजाची पद्धत, कोणत्या ठिकाणी नियुक्ती झाली होती, त्याने कशा प्रकारे काम केले आणि गणवेशात असताना त्याचे वर्तन कसे होते, या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले.
तपासादरम्यान समोर आलेल्या अशा बाबी समजून घेणे महत्त्वाचे असल्याचेही खंडपीठाने नमूद केले. कारण तपासाच्या नोंदींमध्ये वाजेच्या महागड्या वाहनांमधून फिरण्याचा उल्लेख वारंवार होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. ही वाहने नेमकी कोणाची होती आणि वाजे त्यांचा वापर कोणत्या कारणासाठी करीत होता, याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता न्यायालयाने व्यक्त केली.
 
 
दरम्यान, वाजे आपल्या महागड्या मर्सिडीजमधून मुंबईतील पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ येथे जात असल्याचेही तपासातील काही साक्षीदारांच्या जबाबांमधून समोर आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वाजे तब्बल १०० दिवस राहिला होता, अशी माहितीही सुनावणीदरम्यान देण्यात आली. यावर न्यायालयाने तो एवढ्या दीर्घकाळ हॉटेलमध्ये कसा राहत होता, असा सवाल केला. त्यावेळी वाजेचा मासिक पगार किती होता, अशीही विचारणा करण्यात आली. सध्या त्याचा पगार सुमारे ९० हजार रुपये प्रतिमहिना असल्याचे अनिल सिंह यांनी न्यायालयाला सांगितले.
 
 
 
  वाहनांची यादी
सुनावणीदरम्यान वाजेच्या वापरातील पाच आलिशान वाहनांची यादीही न्यायालयासमोर ठेवण्यात आली. त्यामध्ये पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू, काळ्या रंगाची व्होल्वो, पांढरी मर्सिडीज, पांढरी टोयोटा लँड क्रूझर प्राडो आणि काळ्या रंगाची मर्सिडीज यांचा समावेश होता. ही यादी पाहिल्यानंतर ‘याच्याकडे पाच गाड्या आहेत!’ अशा शब्दांत न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.
या वाहनांच्या खरेदीशी संबंधित कार विक्रेत्यांचे जबाबही तपासादरम्यान नोंदविण्यात आल्याची माहिती अनिल सिंह यांनी दिली. वाजेला ही वाहने विकणाऱ्या कार डीलर्सकडून तपास यंत्रणेने माहिती घेतली असून, वाहनांची खरेदी आणि त्यांच्या वापरासंदर्भातील तपशील तपासात समोर आल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन वाजेवर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित वसुलीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) स्वतंत्र गुन्हाही दाखल केला आहे. तपास यंत्रणा संपूर्ण प्रकरणाचा संबंध वसुलीशी जोडत असेल, तर वाजेच्या महागड्या गाड्या, पंचतारांकित हॉटेलमधील वास्तव्य आणि त्याच्याशी संबंधित इतर खर्चाची माहितीही प्रकरणाचा संदर्भ समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केले.
दरम्यान, सीबीआयच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने नंतर सचिन वाजेला सरकारी साक्षीदार होण्यासाठी माफी मंजूर केली होती. मात्र, अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) तपास सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वाजे अद्याप आरोपी आहे. एंटीलिया बॉम्बप्रकरणातील त्याचा जामीन रद्द करण्याच्या एनआयएच्या याचिकेवर सुनावणी सुरू असून, महागड्या वाहनांचा वापर, आर्थिक क्षमता आणि तपासात समोर आलेल्या इतर बाबींच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने केलेली निरीक्षणे या सुनावणीत महत्त्वाची ठरली आहेत.