गोंदिया,
successful-rescue नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत नागझिरा खंडातील कोका वन्यजीव अभयारण्य परिसरात ढिवरवाडा गावालगतच्या स्मशानभूमी परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या अस्वलाचे वनविभागाने यशस्वी रेस्क्यू केले. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१७ वाजता सहवनक्षेत्र कोका, नियतक्षेत्र डोंगरदेव, कक्ष क्रमांक १६२ येथे ही कार्यवाही करण्यात आली. अस्वलाच्या मागील उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले असून, पुढील उपचारांसाठी त्याला गोरेवाडा येथील वन्यजीव उपचार केंद्रात पाठविण्यात आले आहे.
ढिवरवाडा गावालगतच्या स्मशानभूमी परिसरात अस्वल भ्रमण करत असताना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. अस्वल जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने वनरक्षक आकाश जाधव यांच्याशी संपर्क साधून वन्यजीव विभागाला घटनेची माहिती दिली. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आणि निर्धारित प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन करत वनविभागाने जखमी अस्वलाला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्याची मोहीम राबविली. क्षेत्र संचालक पियुषा जगताप आणि उपसंचालक तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेत सहायक वनसंरक्षक सुहास कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरजकुमार गोखले, मानद वन्यजीव रक्षक भंडारा शाहीद खान, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी मेघराज तुलावी, क्षेत्र सहाय्यक मेश्राम, बिट रक्षक जाधव, जलद प्रतिसाद पथकातील शूटर व कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, अथक प्रयत्नांनंतर अस्वलाला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. यानंतर अस्वलाची प्राथमिक पशुवैद्यकीय तपासणी करून पुढील आवश्यक औषधोपचारासाठी गोरेवाडा येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविण्यात आले.