हिंदी विद्यापीठाचे डॉ. घोष यांचा पीकिंगच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात संशोधन निबंध

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
वर्धा,
anirban-ghosh-peking-university-seminarमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या भाषा विद्यापीठांतर्गत इंग्रजी आणि विदेशी भाषा अध्ययन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिर्बाण घोष यांनी चीनमधील प्रतिष्ठित पीकिंग विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभाग नोंदवत संशोधन निबंध सादर केला. डॉ. घोष यांचा हा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहभाग विद्यापीठाच्या जागतिक शैक्षणिक उपस्थितीचा तसेच भारत-चीन सांस्कृतिक आणि भाषिक अध्ययन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणून पाहिला जात आहे. या यशाबद्दल कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय ओळखीचे प्रतीक असल्याचे सांगत डॉ. अनिर्बाण घोष यांचे अभिनंदन केले.
 

hindi
 
पीकिंग विद्यापीठाच्या पूर्वीय साहित्य संशोधन केंद्र तसेच विदेशी भाषा विद्यापीठाच्या प्राच्य अध्ययन विभागाच्या स्थापनेला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय परिसंवादात डॉ. घोष यांनी चीनमधील भारतीय भाषांचा अभ्यास : पीकिंग विद्यापीठाच्या प्राच्य अध्ययन विभागाच्या स्थापनेत चिनी आणि भारतीय विद्वानांचे योगदान या विषयावर संशोधन निबंध सादर केला.
 
या परिसंवादात भारतातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ यांच्यासह ब्रिटनमधील ऑसफर्ड आणि एडिनबर्ग विद्यापीठ, अमेरिकेतील न्यूयॉर्क, फिलिपाइन्समधील मनीला, जर्मनीतील बॉन, दक्षिण कोरियातील सियोल, मंगोलिया राष्ट्रीय विद्यापीठ, व्हिएतनाममधील चियांग माई विद्यापीठ तसेच चीनमधील २० हून अधिक विद्यापीठांतील सुमारे ७० तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी झाले होते.
 
परिसंवादादरम्यान आशिया आणि जगातील प्राच्यविद्येचा इतिहास, वर्तमान स्थिती आणि भविष्यातील शयता यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, चीनमध्ये भारत अध्ययनाची औपचारिक सुरुवात सुमारे १०० वर्षांपूर्वी पीकिंग विद्यापीठातूनच झाली होती. या आंतरराष्ट्रीय आयोजनात पीकिंग विद्यापीठाव्यतिरिक्त चिंगहुआ, रेनमिन, बीजिंग फॉरेन स्टडीज विद्यापीठ तसेच शांघाय, चोंगकिंग, निंगश्या आणि वुहान येथील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थांतील तज्ज्ञांनीही सहभाग नोंदविला.