मूल,
chandrapur bear-rescueतालुक्यातील खालवसपेठ गावात शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास एका अस्वलाने अचानक शिरकाव. त्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी आणि त्याच गर्दीपासून जीव वाचविण्यासाठी पळणारे अस्वल थेट दोन घरांच्या भिंतींमधील अरुंद जागेत अडकले. या अनोख्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. अखेर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तब्बल तासभर राबविलेल्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’नंतर अस्वलाला सुरक्षितपणे बाहेर काढले.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास हे अस्वल लीलाधर गुरनुले यांच्या घराजवळील तुरीच्या शेतात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास अस्वल गावात आल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गर्दी वाढल्याने अस्वलाने जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, गुरनुले यांच्या घराजवळून जात असताना दोन घरांच्या भिंतींमधील अरुंद जागेत ते अडकले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. महेशकर वनकर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी वनविभागाने ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू केले. सुमारे तासभर प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर पथकाला अस्वलाला पकडण्यात यश आले. पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून आवश्यक उपचार केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या मोहिमेत चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. महेशकर, मूलचे क्षेत्र सहयक एस. टी. टेकाम, चंद्रपूर येथील आरआरयू पथक तसेच मूल उपक्षेत्रातील सर्व नियतक्षेत्रांचे वनरक्षक आणि वनमजूर सहभागी झाले होते.
मूल तालुक्यातील गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन्यप्राणी थेट गावात शिरत असल्याने नागरिक आणि वन्यप्राणी आमनेसामने येण्याचा धोका वाढला आहे. खालवसपेठेतील घटनेत अस्वलाला पाहण्यासाठी झालेली गर्दीही परिस्थिती अधिक गंभीर बनवू शकली असती. त्यामुळे वनविभागाने वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून गावांमध्ये त्यांचा शिरकाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे