मुंबई
weather alert राज्यातील अनेक भागांत ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम आहे. अनेक भागांत सध्या पावसाने उघडीप दिली असून काही भागांत हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. दुसरीकडे, कोकण विभागातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरसाठी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, कोकणातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.
10 ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्यामुळं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत 10 ऑक्टोबर रोजी हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मात्र, कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साताऱ्याच्या घाटमाथा परिसरातही हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसह नाशिकच्या घाटमाथा परिसरात 10 ऑक्टोबर रोजी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसाचा अंदाज नसून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. नाशिक येथील तापमान 20 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमधील तापमान 21 ते 38 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी 10 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने कोणताही विशेष इशारा दिलेला नाही. वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यांतील तापमान 22 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. याठिकाणी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.