गडचिरोली,
Gadchiroli Newsबौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा, यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे. या विद्यार्थ्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
शासन स्तरावर बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम राबविणार्या ‘दिशा अभियाना’मार्फत निवड करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांचा आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दालनात सत्कार करण्यात आला. यावेळी सीइओ सुहास गाडे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या शिक्षकांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहायक आयुक्त चेतन हिवंज यांनी दिशा अभियानाच्या कार्याचा आढावा घेतला. हे अभियान केवळ विभागाच्या शाळांपुरते मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढवावी. सर्व शाळांमधील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांनाही या विशेष अभ्यासक्रमाचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी अभियान राबविणार्या ‘जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, मुंबई’ या संस्थेकडे व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संयोजन दिशा अभियानाचे समन्वयक अभय रोटे व निलेश तोरे यांनी केले. यावेळी बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांमधील विशेष शिक्षक उपस्थित होते.