प्रेयसीचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर केले व्हायरल

दुसऱ्याशी लग्न केल्यामुळे प्रियकराकडून कृत्य

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर,
girlfriends-obscene-photos-circulated प्रेमसंबंधात लग्न करण्याच्या आणाभाका घेऊन नाते संपविल्यानंतर दुसऱ्या तरुणाशी विवाह केल्यामुळे प्रियकर संतप्त झाला. त्याने प्रेयसीचा कथितरीत्या छळ करून तिचे अश्लील फोटो तिच्या परवानगीशिवाय इन्स्टाग्रामवर प्रसारित केले. ही बाब प्रेयसीच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुजरातमधील २८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक नरेंद्र देवाणे(रा. वेरावळ, जि. सोमनाथ, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे.
 
girlfriends-obscene-photos-circulated
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन परिसरातील २५ वर्षीय महिलेचे प्रतीकसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते. दोघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या काळात आरोपीने तिचे अश्लील फोटो काढले. त्याच्या वर्तनावर आक्षेप घेत तरुणीने त्याच्यासोबतचे नाते संपविले. त्यानंतर तिने दुसऱ्या तरुणाशी विवाह केला. मात्र, नाते संपल्यानंतरही आरोपीकडून महिलेचा कथित छळ सुरूच राहिला. त्याने महिलेचे खासगी फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकाराबाबत महिलेने यापूर्वीही पोलिसांकडे तक्रार केली होती.
 
 
त्यानंतरही आरोपीने महिलेला तसेच तिच्या पतीला फोन करून कथितरीत्या शिवीगाळ व अश्लील भाषेत त्रास दिल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर आरोपी महिलेच्या सोशल मीडिया खात्यांवर लक्ष ठेवून तिचे खासगी फोटो तिच्या संमतीशिवाय इन्स्टाग्रामवर प्रसारित करीत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी प्रतीक देवाणेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८, २९६, ३५१(२), ३५२ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६६(सी) आणि ६६(ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरून करण्यात आलेला कथित छळ आणि खासगी छायाचित्रांच्या प्रसारणाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.