केदारनाथ वारीला आता ‘आकाशमार्गाची साथ’!

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
kedarnath-vari चारधाम यात्रेकरूंचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून या बुकिंगला सुरुवात होणार असून, भाविकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. १६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीतील प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध असेल.
 
kedarnath-vari
 
ऑनलाइन बुकिंगसाठी स्वतंत्र वेबसाइट
केदारनाथला हेलिकॉप्टरने जाण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी आयआरसीटीसीने स्वतंत्र वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. उत्तराखंड सरकारने या सुविधेसाठी आयआरसीटीसीसोबत सहकार्य केले आहे. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास महामंडळाच्या माहितीनुसार, भाविकांना heliyatra.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवरून आरक्षण करता येईल. केदारनाथसाठी तिकिटे केवळ ऑनलाइन उपलब्ध असणार असून, ऑफलाइन बुकिंगची सोय करण्यात आलेली नाही.
 
असे करा हेलिकॉप्टरचे तिकीट बुक
तिकीट आरक्षित करण्यासाठी सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या हेलीयात्रा वेबसाइटला भेट द्यावी. तेथील मुख्य पानावर केदारनाथ आणि हेमकुंड साहिबसाठी हेलिकॉप्टर बुकिंगचे पर्याय दिसतील. केदारनाथच्या प्रवासासाठी ‘बुक टिकीट’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर लॉगिन पेज उघडेल. नवीन वापरकर्त्यांनी ‘क्रिएट अ अकाउंट’ हा पर्याय निवडून खाते तयार करावे. त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करून उपलब्ध तारखांनुसार तिकिटांचे आरक्षण करता येईल. हेमकुंड साहिबसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंगची प्रक्रिया २२ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू करण्यात आली होती.
 
केदारनाथ दर्शनासाठी लाखो भाविकांची हजेरी
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा ही देशभरातील भाविकांसाठी महत्त्वाची धार्मिक यात्रा मानली जाते. केदारनाथ धामचे दरवाजे २२ एप्रिल रोजी उघडल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. उपलब्ध आकडेवारीनुसार, मंदिराचे दरवाजे उघडल्यापासून ११ लाख ५ हजार ६७६ भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे.
 
बद्रीनाथ धामच्या यात्रेला २३ एप्रिलपासून सुरुवात झाली असून, तेथे ९ लाख ८ हजार ६१९ भाविकांनी दर्शन घेतले. गंगोत्री मंदिरात ५ लाख २८ हजार ४०६, तर यमुनोत्री मंदिरात ५ लाख ७ हजार ४२१ भाविकांनी भेट दिली आहे. शीख धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्री हेमकुंड साहिब येथेही ५५ हजार ४११ भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद आहे.
 
केदारनाथसाठी हेलिकॉप्टर बुकिंगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे यात्रेकरूंना आपल्या प्रवासाचे नियोजन ऑनलाइन करता येणार आहे. इच्छुक भाविकांनी आरक्षणासाठी अधिकृत वेबसाइटचा वापर करावा आणि प्रवासाच्या तारखांची खात्री करूनच तिकीट बुक करावे.