गोंदिया,
leopard-killed जिल्ह्यातील देवरी परिसरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील मासूलकसा घाट परिसरात एका प्रौढ नर बिबट्याचा भरधाव अज्ञात ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी ८ ऑक्टोबरच्या रात्री घडली. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातात बिबट्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मासूलकसा घाट परिसरातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना सदर बिबट्याला भरधाव वेगाने जाणार्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. मृत बिबट्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्षे असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कोका वन्यजीव परिक्षेत्र तसेच देवरी वन परिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृत्यूच्या घटनेशी संबंधित आवश्यक वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम वन विभागाकडून करण्यात आले. दरम्यान, बिबट्याला धडक देऊन घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
राष्ट्रीय महामार्गावर उपाय-योजनांची गरज...
राष्ट्रीय महामार्गावरील मासूलकसा घाट परिसर जंगल व्याप्त परिसर असून या भागात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनांमुळे वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना वन्यप्राण्यांना वाहनांचा अंदाज येत नसल्याने अनेकदा असे अपघात घडतात. तेव्हा जंगलालगतच्या महामार्गांवर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे, वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत वाहनचालकांना सतर्क करणे आणि आवश्यक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.