जेवर विमानतळाची नवी ओळख ‘मोदी’!

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
लखनौ,
jewar-airport उत्तर प्रदेशातील नोएडा परिसरात उभारण्यात आलेल्या जेवर विमानतळाच्या नामकरणाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात येणार असून, त्याचे नाव ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे ठेवण्यात येईल, असे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले. या बैठकीत विविध प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.
 
jewar-airport
मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या वतीने योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे अभिनंदन केले. ७ ऑक्टोबर हा दिवस देशाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे नमूद करत त्यांनी मोदींच्या सार्वजनिक सेवेतील प्रवासाचा उल्लेख केला. ‘सेवा हीच निष्ठा’ आणि ‘राष्ट्र प्रथम’ या विचारांना केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधानांनी राष्ट्रउभारणीला प्राधान्य दिले आहे, असे योगी म्हणाले. लोकसेवेच्या माध्यमातून जनकल्याण साधणे आणि जनतेच्या सहभागातून विश्वास निर्माण करणे, हे मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाचे वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेशच्या विकासावर भर
पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेश यांच्यातील संबंधांचा उल्लेख करताना योगी आदित्यनाथ यांनी काशी आणि गंगा यांच्याशी मोदींचे असलेले नाते अधोरेखित केले. २०१४ मध्ये काशीला भेट दिल्यानंतर मोदी यांनी गंगा मातेने आपल्याला बोलावल्याची भावना व्यक्त केली होती, असे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय तसेच ‘टीम इंडिया’च्या भावनेतून उत्तर प्रदेश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. २०१७ पूर्वी राज्याला प्रशासकीय अस्थिरता, असुरक्षिततेची भावना आणि मूलभूत सुविधांच्या कमतरतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत होते, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांच्या विकासविषयक दृष्टिकोनातून प्रेरणा घेत राज्यात प्रशासनाची नवी कार्यपद्धती विकसित झाल्याचा दावा योगी यांनी केला. सुशासन, कायदा व सुव्यवस्था, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण यांवर राज्याने भर दिला असून, उत्तर प्रदेश नव्या आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.