अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-news महाराष्ट्रासह अन्य राज्यात तब्बल १२० ठिकाणी घरफोडी आणि चोरी करणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. त्या चोरट्याला सापळा रचून लकडगंज पोलिसांनी अटक केली. आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने या कुख्यात चोरट्याला ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. नरेश अंकालू महिलांगे (वय ३४ वर्षे, डीप्टी सिग्नल,कळमना) असे आरोपीचे नाव आहे. नरेश महिलांगे हा कारागृहातून बाहेर आल्यानंतर एका ठिकाणी न राहता दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जात असे. तेथे रात्री बंद घरे हेरून सलग घरफोड्या करून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरल्यानंतर पोलिसांची नजर चुकविण्यासाठी पुन्हा ठिकाण बदलत असे, अशी त्याची कार्यपद्धती होती.

पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजचे सूक्ष्म विश्लेषण, तांत्रिक पुरावे, सी.ए. अहवाल तसेच अन्य वैज्ञानिक पुराव्यांची सांगड घातली. संबंधित साक्षीदारांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने महिलांगे याला दोषी ठरविले. महिलांगेविरुद्ध यापूर्वी मकोका, तडीपार आणि एमपीडीए अंतर्गतही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ यांसह विविध जिल्ह्यांत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांत तो संबंधित पोलिसांना पाहिजे असल्याचेही तपासात समोर आले. शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांचीही त्याच्यावर नोंद आहे. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. साई खेडकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. लकडगंजचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वाखाली लकडगंज पोलिसांच्या पथकाने तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. सराईत चोरट्याला झालेली शिक्षा ही पोलिसांच्या शास्त्रीय तपास, वैज्ञानिक पुरावे संकलन, साक्षीदारांचा पाठपुरावा आणि प्रभावी अभियोजनाचे फलित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.