पराग मगर
मे महिन्यातील भेट ठरली अखेरची
नागपूर,
jal-kranti-water-revolution ‘आपल्या काहीशा देण्याने दुसऱ्याला आनंद मिळत असेल, तर यासारखे दुसरे समाधान नाही. शेवटी प्रत्येकाला जाळण्यासाठी १२ मण लाकडंच लागणार आहेत. मरणावर विश्वास ठेवला की जगणं फार छान होतं...’ प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे मे २०२६ मध्ये नागपुरात झालेल्या जलक्रांती परिषदेतील हे शब्द त्यांच्या दातृत्वशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय देणारे ठरले.
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय जलसंवाद व जलक्रांती परिषदेत नाना पाटेकर प्रमुख उद्बोधक म्हणून उपस्थित होते. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी विदर्भातील जलसंकटावर भाष्य करीत, चर्चेपेक्षा नियोजनबद्ध आणि प्रत्यक्ष कृतीची गरज अधोरेखित केली होती. त्यांची ही भेट नागपूरकरांसाठी शेवटची ठरली.
‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून काम करताना आलेले अनुभव सांगताना त्यांनी आयुष्याच्या क्षणभंगुरतेवर भाष्य केले होते. ‘शहरातील भिंती मला आता कबरीसारख्या वाटतात. समाजातील प्रश्न शहरातील लोकांना दिसेनासे झाले आहेत,’ अशी खंत व्यक्त करीत त्यांनी माणसांच्या स्वार्थी जगण्यावरही प्रहार केला होता. त्यांचे हे परखड विचार नागपूरकरांच्या स्मरणात कायम राहतील.
‘इथे नाटक करता आलं असतं तर...’
मे महिन्यातील नागपूरच्या रणरणत्या उन्हातही नाना पाटेकर यांना ऐकण्यासाठी १८ मे रोजी रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुरेश भट सभागृह खचाखच भरले होते. नाना हे मुळात नाट्यकलावंत. त्यामुळे सभागृहातील गर्दी पाहून ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘या रसिकांसमोर इथे नाटक करता आलं असतं तर... टू बी ऑर नॉट टू बी!’
हे ऐकताच प्रेक्षकांनी ‘नटसम्राट’मधील संवाद ऐकवण्याची विनंती केली, तेव्हा आपल्या खास मिस्कील शैलीत ते म्हणाले, ‘जोपर्यंत माझ्या कानाला पैशांचा छनछनाट ऐकू येत नाही, तोपर्यंत तोंडातून डायलॉग निघतच नाही.’ ‘नटसम्राट’ नाटक साकारलेल्या कलाकारांच्या निधनाबद्दलही त्यांनी सहज टिपणी केली होती. नियतीचा विचित्र योगायोग असा की, अखेर नानांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मे महिन्यात नागपूरकरांशी साधलेला हा संवाद आता त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि त्यांच्या जीवनदृष्टीची जाणीव करून देणारा ठरला आहे.