नानांचा ‘दम’ अन् विद्यार्थ्यांनी सोडली सिगारेट

छायाचित्रकार नानू नेवरे यांनी जागविल्या नागपूरच्या आठवणी

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
पराग मगर
नागपूर,
nanas-stern-words ‘१९८६ किंवा १९८७ची गोष्ट असावी. ‘अंकुश’ चित्रपटामुळे नाना पाटेकर प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागले होते. ते नागपूरला आल्यानंतर मी त्यांच्यासोबतच असायचो. माझ्या मारुती कारने आम्ही विद्यापीठाकडे जात असताना नानांना दोन विद्यार्थी बाईकवर सिगारेट ओढताना दिसले. नानांनी मला गाडी थांबवायला सांगितले. रस्त्याच्या कडेला आम्ही उभे राहिलो. ते दोन विद्यार्थीही तिथे आले. त्यांना पाहताच नाना संतापले. “कॉलेजला शिकायला येता की सिगारेट ओढायला?” नानांना पाहताच ते विद्यार्थी ओरडले, “अरे, नाना पाटेकर!” त्यानंतर त्यांनी लगेचच, “सॉरी सर, आजपासून सिगारेट सोडली,” असे सांगितले.

nanas-stern-words
नागपूरचे प्रसिद्ध छायाचित्रकार नानू नेवरे यांच्यासोबतचा हा किस्सा. नाना पाटेकर हे त्यांचे खासमखास मित्र. सर जे. जे. स्कूल हा देखील दोघांना जोडणारा धागा होता. नेवरे सांगतात, १९८६ ची गोष्ट असावी. धनवटे रंगमंदिरात ‘पुरुष’ नाटकाच्या प्रयोगासाठी नाना पाटेकर आले होते. तेव्हा प्रसिद्धीचे वलय त्यांच्यापासून जरा दूरच होते. तेव्हा आमची पहिली भेट झाली. ते खास माझ्या स्टुडिओमध्ये यायचे आणि त्यांचे अनेक फोटो मी तिथे काढले. ‘अंकुश’ चित्रपट रीलिज झाला तेव्हा नागपूरला नाना पाटेकर आले असताना नानू नेवरे यांनी त्यांचे खास फोटो काढले होते. ते फोटो मागण्यासाठी अनेक जण दररोज रांगा लावायचे, अशी आठवणही नेवरे यांनी सांगितली.
एक फोटो अन् ‘तो’ विद्यार्थी झाला सेलिब्रिटी
‘यशवंत’ चित्रपटाने नाना पाटेकर यांना वेगळी ओळख दिली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते नागपुरात आले असता नानू नेवरे यांनी त्यांचे खास फोटो काढले. नेवरे सांगतात, त्या वेळी विद्यार्थी फोटो काढायला स्टुडिओत यायचे. एका विद्यार्थ्याने नानांचा फोटो पाहून, वडिलांना त्या फोटोसाठी गळ घातली. मी हे सर्व ऐकत होतो. शेवटी वडिलांनी विचारून हो म्हटल्यावर तो माझ्याकडे आला आणि ‘हा नाना पाटेकर यांचा फोटो कितीला मिळेल?’ असे विचारले. त्याच्या नानांवरील प्रेमापोटी मी त्याला तो फोटो मोफत दिला. त्याने तो फोटो शाळेत सर्वांना दाखविताच तो विद्यार्थी तर फेमस झालाच; पण तो फोटो मागण्यासाठी विद्यार्थ्यांची रांग माझ्या स्टुडिओत लागली, असे नेवरे यांनी सांगितले.
जिंदादिल माणूस
नानू नेवरे आणि नाना पाटेकर यांची मैत्री नागपूरच्या कलाक्षेत्रात प्रसिद्ध होती. नाना कधीही नागपुरात आले तरी नानूंच्या स्टुडिओमध्ये गेल्याशिवाय राहत नसत. एक जिंदादिल माणूस कसा असावा, तर नानांसारखा, असे नेवरे सांगतात. आता-आता एका उपक्रमासाठी त्यांची भेट घेण्यासाठी जायचे होते. बोलणेही झाले होते. पण आता ती भेट कधीच होऊ शकणार नाही, अशी खंतही नानू नेवरे यांनी व्यक्त केली.