वर्धा,
newspaper-vendors-protestवर्षानुवर्षे संघर्ष करूनही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पदरी उपेक्षाच आहे. मंत्रिमंडळाने मंजुरी देऊनही वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. शासनाच्या या दिरंगाईिवरोधात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आज ९ रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातही वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आर्वी, पुलगाव, हिंगणघाट येथे आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
वर्धेत वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्यालयातून विक्रेत्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात गजानन मसने, संजय देवगिरकर, बंडू मुळे यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या १६ ते १७ वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेते आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत. १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाने महामंडळाच्या निर्णयाला मंजुरी दिली. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. केवळ मंजुरी नको, महामंडळ प्रत्यक्ष सुरू करा वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा द्यावी, कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून द्या आणि महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. राज्यभरातील या आंदोलनाच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. महामंडळाची अंमलबजावणी करून कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या संघटनेने केली.
पुलगाव : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे वतीने पुलगाव तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोच्र्यात वृत्तपत्र विक्रेतांचे कुटुंबीयांचा सहभाग होता. दीपक कुंभारे, गोपाळ काळे, रवींद्र सदाफळे, धनराज टेंभूर्णे, विनोद पांडे, बिपीन अंजीकर, अतुल विरूळकर, राजेश भगत, घनश्याम कुंभारे यांनी निवेदन दिले.
आर्वी : आर्वी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुनील पारसे, सदस्य प्रवीण सरोदे, राजेश सोळंकी, जिल्ह्यातील एकमेव महिला वृत्तपत्र विक्रेता शुभांगी पारसे, आनंद गोटे, स्वप्निल गुल्हाने, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर मेंद्रे, बाळा कुलकर्णी, सचिन गायधने, सुभाष मांडेकर, रवींद्र दारूंडे यांचे सह तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेता व पत्रकार उपस्थित होते.