इस्लामाबाद,
pakistan-15-new-provinces-planपाकिस्तानच्या चार प्रमुख प्रांतांचे १५ तुकडे करून नवीन प्रांत तयार करण्याचा प्रस्ताव लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी सरकारसमोर ठेवला आहे. लहान प्रशासकीय प्रदेश निर्माण करून पंजाब आणि सिंधसारख्या मोठ्या प्रांतांची राजकीय शक्ती कमी करणे या प्रस्तावाचा उद्देश आहे. ‘पीटीआय’सह इतर विरोधी पक्षांनी या प्रस्तावाना तीव्र विरोध केला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा नकाशा बदलणार आहे.

आपल्या कृत्यांमुळे जागतिक स्तरावर कुप्रसिद्धी मिळवलेला पाकिस्तान राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हातात सत्ता असल्याचा आव आणत असला तरी, प्रत्यक्षात तेथील सत्ता लष्कराच्या हातात असल्याचे जगजाहीर आहे. अशातच सत्तेवरील पकड अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानमे मुनीर यांनी देशाचे पंधरा तुकडे करण्याची योजना आखली आहे. सध्याच्या चार प्रमुख प्रांतांचे विघटन करून लहान प्रांतांची निर्मिती करण्यासाठी त्यांनी सरकारसमोर प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यास देशात १५ नवीन प्रांत अस्तित्वात येऊ शकतात. इतकेच नव्हे तर प्रशासकीय सोयीसाठी तब्बल १६० लहान प्रशासकीय विभाग तयार करण्याचा पर्यायही विचाराधीन आहे. सध्या पाकिस्तानमध्ये पंजाब, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान हे चार प्रांत आहेत. त्यांच्या विभाजनामुळे प्रशासकीय व्यवस्थेत मोठे बदल होईल याचा परिणाम केवळ शासकीय कार्यांपुरता मर्यादित राहणार नाही, यामुळे देशातील राजकीय सत्तेचे संतुलनही बदलणार आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी या प्रस्तावाची माहिती एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून दिली आहे.
पंजाब, सिंधवर वर्चस्वाचा डाव
प्रस्तावावर टीका करताना ‘पीटीआय’ पक्षाचे नेते गोहर अली खान यांनी म्हटले की, मुनीरचे लक्ष्य पंजाब आणि सिंधचे विभाजन करणे आहे. पंजाब आणि सिंध ही अशी राज्ये आहेत जिथे दोन सर्वात जुने राजकीय पक्ष, पीएमएल(एन) आणि पीपीपी, यांनी दीर्घकाळ पाकिस्तानी राजकारणावर वर्चस्व गाजवले आहे. मात्र, मुनीर यांना या प्रदेशावर वर्चस्व मिळवायचे असल्याने त्यांनी विभाजनाचा डाव आखला आहे. लष्करी हुकूमशाहीच्या काळात या प्रांतांनी विरोधाचे एक पर्यायी केंद्र म्हणून टिकवून ठेवले. यामुळेच मुनीर आता या प्रमुख बालेकिल्ल्यांना लक्ष्य करत आहेत.