चंद्रपूर,
tadoba-tiger-attack-chandrapurताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी तलाव परिसरात शेतात काम करीत असताना महिलेचा बळी घेणार्या वाघाला वन विभागाच्या जलद प्रतिसाद पथकाने मंगळवारी बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या पकडले.
आगरझरी तलावालगतच्या शेतात 5 ऑक्टोबर रोजी मंदा सूर्यभान मंगाम (60) या खताची गोणी धूत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन रोखून वाघाला पिंजरा लावून पकडण्याची मागणी केली होती. शेतात जाणार्या शेतकर्यांच्या सुरक्षेसाठी वन कर्मचार्यांची मदत उपलब्ध करून द्यावी, तसेच आवश्यकतेनुसार कर्मचार्यांना शेतकर्यांसोबत पाठवावे, अशी मागणीही करण्यात आली होती.
ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत ट्रॅप कॅमेरे आणि प्रत्यक्ष गस्तीद्वारे त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत होते. अखेर मंगळवारी आरआरटी पथकाने वाघाला बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले.वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पकडलेल्या वाघाला आवश्यक तपासणी व उपचारांसाठी चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामस्थांच्या मागणीनुसार आगरझरी तलाव परिसरातील कचर्याचीही साफसफाई करण्यात आली.