पत्नी व मुलाचा खून करणाऱ्या नराधमाला दुहेरी जन्मठेप

शेतात पुरला होता मृतदेह

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
the-dead-body-was-buried-in-the-field कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाची हत्या करून त्यांचे मृतदेह स्वतःच्या शेतात पुरणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. जे. मोडक यांनी आरोपी अनिरुद्ध सुखदेव बावणे याला पत्नी व मुलाच्या खुनाच्या दोन गुन्ह्यांसाठी दुहेरी जन्मठेप ठोठावली. तसेच मृतदेह लपविल्याप्रकरणी सात वर्षांचा कारावास आणि २,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
 
the-dead-body-was-buried-in-the-field
 
ही घटना अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१८ मध्ये घडली होती. आरोपी अनिरुद्ध आणि पत्नी लता यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी लता आणि त्यांचा मुलगा धीरज बेपत्ता असल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली होती. ४ डिसेंबर २०१८ रोजी मृतकाचा भाऊ नारायण डहाके यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला. अनिरुद्धने पत्नी लता आणि मुलगा धीरज यांना जड वस्तूने मारून त्यांची हत्या केली आणि दोघांचे मृतदेह स्वतःच्या शेतात पुरल्याचे तपासात समोर आले.
 
 
या प्रकरणी अरोली पोलिसांनी अनिरुद्ध बावणे आणि श्यामलाल डहाके यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ व २०१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. जे. मोडक यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मुकुंद कमलाकर यांनी १७ साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने अनिरुद्ध बावणे याला पत्नी व मुलाच्या खुनासाठी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच मृतदेह पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षांचा कारावास आणि २,५०० रुपये दंड ठोठावला. या प्रकरणाची बाजू सरकारी वकील मुकुंद कमलाकर यांनी मांडली.