कलावंतापलीकडचा ‘नाना’ नागपूरने अनुभवला!

शेतकरी कुटुंबांच्या मदतीपासून जलक्रांती परिषदेपर्यंतचा प्रवास

    दिनांक :09-Oct-2026
Total Views |
पराग मगर
नागपूर,
water-revolution-conference शेतकऱ्यांच्या वेदनांनी अस्वस्थ होणारे फारच थोडे कलाकार आहेत. त्यातील अग्रणी नाव म्हणजे नाना पाटेकर. विदर्भ आणि खास करून नागपूरशी त्यांचे नाते खास समाजिक जाणिवांनी जोडले गेले होते. कधी शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी, कधी सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने, तर कधी जलसंवर्धनाच्या नव्या संकल्पनेला बळ देण्यासाठी ते वेळोवेळी नागपुरात आले. प्रत्येक वेळी त्यांच्या संवादाचा केंद्रबिंदू केवळ स्वतःची कला नव्हती, तर सामान्य माणसाचे जगणे हा होता.

water-revolution-conference
नानांचे नागपूरशी असलेले ऋणानुबंध केवळ एखाद्या कार्यक्रमापुरते मर्यादित नव्हते. विविध कार्यक्रम व उपक्रमासाठी ते वेळोवेळी नागपुरात आले. २०१५ मध्ये विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्यापासून ते मे २०२६ मधील जलक्रांती परिषदेपर्यंत त्यांच्या नागपूर भेटींचा एक महत्त्वपूर्ण सामाजिक प्रवास दिसून येतो. या भेटींच्या आठवणींतून प्रसिद्धीच्या झगमगाटापलीकडे जाऊन माणसांच्या आयुष्याला स्पर्श करण्याची त्यांची धडपड अधोरेखित होते.
नागपूरशी नानांचे नाते अधोरेखित करणाऱ्या सर्वांत महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे १० ऑगस्ट २०१५ रोजीचा मदतवाटप कार्यक्रम. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील जनमंच या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ६१ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे धनादेश दिले. या कुटुंबांच्या मदतीसाठी दोन्ही अभिनेत्यांनी सुमारे २४ लाख रुपये जमा केले होते.
 
 
या कार्यक्रमात नानांनी सरकार काय करते किंवा काय करत नाही, याची वाट पाहत बसण्यापेक्षा संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. तसेच १३ ऑगस्ट २०१६ रोजी नाना पाटेकर नागपुरात आले असता त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट देत विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली होती. १९ जानेवारी २०२० रोजी रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याला नाना पाटेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात महिला उद्योजिकांसोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या श्रमांना योग्य मोबदला मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. नागपूरच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती ही आयोजकांसाठी आकर्षणाची बाब असली, तरी नाना स्वतः मात्र अशा मंचांचा उपयोग समाजातील प्रश्न मांडण्यासाठी करताना दिसत होते.
नानांच्या नागपूर भेटींच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे १८ मे २०२६ रोजीची जलक्रांती परिषद. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित परिषदेत नाना पाटेकर सहभागी झाले होते. विविध संस्थांनी पाणीप्रश्नांवर एकत्र येण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त करतानाच ‘नाम’चे कार्यालय नागपुरात सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती जी त्यांच्या हयातीत राहून गेली. नागपूरने नानांना सांस्कृतिक मंच दिला, विदर्भाने त्यांना शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव करून दिली. त्या जाणिवेतून जलसंवर्धनाचे काम करण्याची इच्छा त्यांच्या मनात रुजली. म्हणूनच त्यांच्या नागपूर भेटींची आठवण केवळ एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या दौऱ्याची नोंद राहत नाही, तर एका संवेदनशील माणसाने समाजाच्या वेदनांशी जोडून घेण्याचा केलेला प्रयत्न ठरते.
२०२२ च्या खासदार महोत्सवाला उपस्थिती
२ डिसेंबर २०२२ रोजी नागपुरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सहाव्या पर्वाचे उद्घाटनही नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी कला, अभिनय आणि आनंद यांविषयी संवाद साधला. या दिवशी जिल्ह्यातील काटोल येथे अरविंद सहकारी बँकेच्या परिसरात दिवंगत अरविंदबाबू देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात काटोल आणि नरखेड तालुक्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे धनादेश त्यांनी दिले होते.